राजकोट, भारत विरुद्ध वेस्ट इंडीज : भारताच्या वरिष्ठ संघाकडून कसोटी पदार्पण करण्यासाठी मुंबईकर पृथ्वी शॉ सज्ज झाला आहे. वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. राजकोट येथे गुरुवारपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीत तो लोकेश राहुलसह सलामीला उतरू शकतो.
इंग्लंड दौऱ्यातील शेवटच्या दोन कसोटीसाठी पृथ्वीचा भारतीय संघात समावेश करण्यात आला होता, परंतु त्याला अंतिम अकरामध्ये संधी मिळाली नाही. त्या दौऱ्यात इंग्लंडने 4-1 असा दणदणीत विजय मिळवला होता, परंतु भारतीय कर्णधार विराट कोहलीने 59.30 च्या सरासरीने 593 धावा चोपल्या होत्या. विराटने त्या दौऱ्यातील यशाचा मंत्र पृथ्वीला सांगितला. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पृथ्वीने हे सांगितले.
वैयक्तिक महत्वाकांक्षा बाजूला ठेवून संघाला नेहमी प्राधान्य दे, असा सल्ला विराटने दिल्याचे पृथ्वीने सांगितले. विराटने दिलेल्या मंत्राबद्दल तो म्हणाला,'' इंग्लंडमध्ये फलंदाजी करताना चेंडू प्रचंड स्वींग होतो. त्यामुळे प्रतिस्पर्धी तुमच्या मनाशी खेळतात. चेंडू कसा व कुठे टाकावा, हे त्यांना बरोबर माहित असते. मग मी कोहलीला विचारले, तु इतक्या धावा कशा केल्यास. त्याने सांगितले की, मी नेहमी संघाला माझ्यापेक्षा अधिक महत्त्व देतो. त्यामुळे धावांची भुक आपोआप वाढते."