मुंबई, भारत वि. वेस्ट इंडीज : भारतीय क्रिकेट संघ 4 ऑक्टोबरपासून वेस्ट इंडीजविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळणार आहे. आशिया चषक स्पर्धेतील विश्रांतीनंतर विराट कोहली पुन्हा एकदा संघाचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज झाला आहे. वेस्ट इंडीजविरुद्ध तो पुन्हा एकदा धावांचा पाऊस पाडण्यासाठी आतुर आहे. त्याला पहिल्याच कसोटीत माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनचा विक्रम मोडण्याची संधी आहे.
विराटने वेस्ट इंडीजविरुद्ध आत्तापर्यंत 10 कसोटीत 502 धावा केल्या आहेत. त्यात दुहेरी शतकाचा समावेश आहे. वेस्ट इंडीजविरुद्ध अझरुद्दीनच्या नावावर 14 सामन्यांत 539 धावा आहेत आणि विराटला 38 धावा करून अझरुद्दीनला मागे टाकण्याची संधी आहे. या आकडेवारीत विराटने माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला आधीच पिछाडीवर सोडले आहे. धोनीने वेस्ट इंडीजविरुद्ध 12 सामन्यांत 476 धावा केल्या आहेत.
वेस्ट इंडीजविरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये सुनील गावस्कर आघाडीवर आहे. त्यांनी 27 कसोटीत 2749 धावा केल्या आहेत. त्यापाठोपाठ राहुल द्रविड ( 1978), व्ही. व्ही. एस. लक्ष्मण ( 1715), सचिन तेंडुलकर ( 1630) आणि दिलीप वेंगसरकर ( 1596) हे अव्वल पाच स्थानावर आहेत.
वेस्ट इंडीजविरुद्ध गावस्कर आणि विराट यांनाच दुहेरी शतक झळकावता आले आहे. विंडिजविरुद्ध सर्वाधिक 13 शतक झळकावण्याचा मानही गावस्कर यांचा आहे. त्यापाठोपाट वेंगसरकर (6), द्रविड (5), लक्ष्मण (4), तेंडुलकर (3), वीरेंद्र सेहवाग (2) आणि धोनी व विराट ( प्रत्येकी 1) यांचा क्रमांक येतो.