Join us  

India Vs West Indies : टीम इंडियाचा सामना करण्यासाठी विंडीजनं बोलावले 'दोन' हुकुमी एक्के

India Vs West Indies :आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाने ट्वेंटी-20, वन डे आणि कसोटी मालिकेसाठी संघ जाहीर केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 11:35 AM

Open in App

फ्लोरिडा, भारत वि. वेस्ट इंडिज : आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाने ट्वेंटी-20, वन डे आणि कसोटी मालिकेसाठी संघ जाहीर केले. आयसीसी क्रमवारीत आघाडीवर असलेल्या भारतीय संघाला सडेतोड उत्तर देण्यासाठी यजमान विंडीजनंही कंबर कसली आहे. त्यांनी पहिल्या दोन ट्वेंटी-20 सामन्यांसाठी संघ जाहीर केला असून त्यात दोन हुकुमी एक्के राष्ट्रीय संघात परतणार आहेत. विंडीजनं संघात सहभागी केलेल्या दोन प्रमुख खेळाडूंमुळे यजमानांची बाजू भक्कम होणार आहे.

टीम इंडियाचे नेतृत्व विराटकडेच! धवनचे पुनरागमन, वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी संघ जाहीर

विंडीजनं भारताविरुद्धच्या पहिल्या दोन ट्वेंटी-20 सामन्यांसाठी फिरकीपटू सुनील नरीन आणि किरॉन पोलार्ड यांना संघात स्थान दिले आहे. त्याशिवाय यष्टिरक्षक अँथोनी ब्रॅम्बल यालाही पदार्पणाची संधी मिळाली आहे. आंद्रे रसेल हाही 14 जणांच्या चमूत आहे, परंतु नुकतीच त्याच्या पायावर शस्त्रक्रिया झाली आहे. त्यामुळे तंदुरुस्ती चाचणीनंतर त्याच्या खेळण्यावर शिक्कमोर्तब होईल. मात्र, ट्वेंटी-20 स्पेशालिस्ट ख्रिस गेलची उणीव या मालिकेत जाणवणारी आहे. कॅनडा येथे होणाऱ्या ग्लोबल ट्वेंटी-20 लीगमध्ये तो खेळणार आहे. त्यामुळे भारताविरुद्धच्या मालिकेसाठी उपलब्ध नसल्याचे त्यानं कळवलं आहे.

नरीनने तीन वर्षांपूर्वी म्हणजेच 2016मध्ये इंग्लंडविरुद्ध शेवटचा ट्वेंटी-20 सामना खेळला होता. त्यानंतर त्याने केवळ वन डे सामन्यांत विंडीज संघाचे प्रतिनिधित्व केले. राष्ट्रीय संघापासून दूर राहिलेल्या नरीनचा वर्ल्ड कप संघात समावेश करण्यात आला होता, परंतु बोटाला झालेल्या दुखापतीमुळे त्यानं माघार घेतील. नरीनला फिरकीसाठी खॅरी पिरे याची साथ लाभणार आहे.

''युवा आणि अनुभवी खेळाडूंची सांगड या संघात घालण्यात आली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीनं आम्ही पाऊल उचलले आहे. त्यामुळे सर्व आघाडींवर चाचपणी करण्याची हीच योग्य वेळ आहे,'' असे निवड समिती प्रमुख रॉबर्ट हायनेस यांनी सांगितले.

3 ऑगस्ट पासून ट्वेंटी-20 मालिकेला सुरुवात होईल. पहिले दोन सामने फ्लोरिडा येथे खेळवण्यात येतील, तर तिसरा सामना गयाना येथे होईल. त्यानंतर तीन वन डे आणि दोन कसोटी सामनेही होणार आहेत.  

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजवेस्ट इंडिजख्रिस गेल