Join us  

India vs West Indies: धोनीचा 'हा' सल्ला सिराजने ऐकला अन् थेट कसोटी संघात पोहोचला!

India vs West Indies:भारत A संघाकडून सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या मोहम्मद सिराजला वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताच्या वरिष्ठ संघात स्थान मिळाले.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2018 2:02 PM

Open in App
ठळक मुद्देऑस्ट्रेलिया A संघाविरुद्धच्या एका सामन्यात त्याने दोन्ही डावांत मिळून ( 8/59 व 3/77 ) 11 विकेट घेतल्या होत्या.

मुंबई, भारत विरुद्ध वेस्ट इंडीज : भारत A संघाकडून सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या मोहम्मद सिराजला वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताच्या वरिष्ठ संघात स्थान मिळाले. भारत विरुद्ध वेस्ट इंडीज कसोटी मालिकेत हैदराबादच्या सिराजसह मयांक अग्रवालही कसोटी पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. कसोटी संघात निवड झाल्यानंतर सिराजने याचे श्रेय अनुभवी यष्टिरक्षक आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला दिले. धोनीने दिलेल्या सल्ल्यामुळे कामगिरीत सुधारणा करता आली आणि थेट कसोटी संघात स्थान मिळाले, असेह सिराज म्हणाला. 

इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय A संघाचा सिराज सदस्य होता. त्याने तेथे दमदार कामगिरी केली. त्यानंतर स्थानिक सामन्यांतही आपली छाप पाडल्यामुळे त्याला वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेत निवडण्यात आले. ऑस्ट्रेलिया A संघाविरुद्धच्या एका सामन्यात त्याने दोन्ही डावांत मिळून ( 8/59 व 3/77 ) 11 विकेट घेतल्या होत्या. मात्र, सिराजला आंतरराष्ट्रीय  ट्वेंटी-20 पदार्पणाच्या सामन्यात धोनीने सल्ला दिला होता. त्यानंतर आपल्या कामगिरीत बरीच सुधारणा झाल्याचे सिराजने सांगितले.

सिराजने 2017 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध ट्वेंटी-20 सामन्यात पदार्पण केले होते. त्यात न्यूझीलंडच्या फलंदाजांकडून सिराजच्या गोलंदाजीची धुलाई केली होती. तेव्हा धोनीने त्याला सल्ला दिला. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सिराजने तो किस्सा सांगितला. तो म्हणाला,'' फलंदाजाच्या फुटवर्कवर लक्ष दे आणि त्यानंतर लाईन व लेन्थ बदल, असे धोनीने मला सांगितले होते. त्याच्या सल्ल्यामुळे मला कामगिरीत सुधारणा करता आली आणि पुढे त्यात अमुलाग्र बदल झाला." 

धोनीप्रमाणे कर्णधार विराट कोहलीनेही पदार्पणाच्या सामन्यात कशी मदत केली होती, हेही सिराजने सांगितले. तो म्हणाला, ''न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेंटी-20 सामन्यात निवड झाली तेव्हा मी विराटशी चर्चा केली. मी घाबरलो होतो. तेव्हा विराटने मला तणाव घेऊ नकोस. फक्त उद्या खेळण्यासाठी सज्ज रहा. मी तुझा खेळ पाहिला आहे. त्यामुळे तशीच गोलंदाजी कर, जास्त प्रयोग करू नकोस, असे सांगितले होते.''  

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजमहेंद्रसिंग धोनी