Join us  

India Vs West Indies : अजिंक्य रहाणेबद्दल कॅप्टन कोहलीनं केलं महत्त्वाचं विधान, म्हणाला...

मुंबईकर अजिंक्य रहाणेला 2018साली कसोटी क्रिकेटमध्ये अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2019 3:23 PM

Open in App

मुंबई : मुंबईकर अजिंक्य रहाणेला 2018साली कसोटी क्रिकेटमध्ये अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला. पण, तरीही भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली कसोटी संघाच्या उपकर्णधार रहाणेच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे. अजिंक्य हा तंत्रशुद्ध फलंदाज असल्याचे मत कोहलीनं व्यक्त केलं. वेस्ट इंडिज दौऱ्याला रवाना होण्यापूर्वी कोहलीनं सोमवारी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यानं अजिंक्यचे कौतुक केलं. या दौऱ्यात भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील दोन सामने खेळणार आहे आणि या कसोटी मालिकेत रहाणे दमदार कामगिरी करेल, असा विश्वासही कोहलीनं व्यक्त केला.

गतवर्षी दक्षिण आफ्रिका दौऱ्यात अजिंक्यला पहिल्या दोन कसोटीत संधी मिळाली नव्हती, परंतु त्यानंतर त्यानं इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यात, तर विंडीजच्या भारत दौऱ्यात कसोटी क्रिकेट खेळला. पण, त्याला गेल्या काही सामन्यांत साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यानं अखेरच्या कसोटी शतकानंतर आतापर्यंत 28 डावांत पाचवेळाच 50+ धावा केल्या आहेत. त्यात त्याची सरासरी ही 24.85 इतकी राहीली आहे. पण, त्यानंतरही कोहलीनं अजिंक्यची पाठराखण केली आहे. 

तो म्हणाला,''रहाणे हा दमदार खेळाडू आहे. तो तांत्रिकदृष्ट्या सक्षम आहेच. तणावाच्या स्थितीत त्याच्या खेळ अधिक बहरतो. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या धावांची सरासरी ही जवळपास 43 इतकी आहे.''  

पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे

  • ट्वेंटी-20 संघात निवड झालेल्या युवा खेळाडूंना आपली छाप सोडण्याची योग्य संधी 
  • मी ट्वेंटी-20 साठी उत्सुक आहेत, काही नवीन चेहरे आहेत. त्यांनी आयपीएल आणि स्थानिक क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे.
  • ट्वेंटी-20 वर्ल्ड कप पुढील वर्षी आहे आणि त्यादृष्टीनं तयारीला लागलो आहोत

 

टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कोहलीला हवीय 'ही' व्यक्ती, पण...कोहली म्हणाला,'' रवी शास्त्रीच प्रशिक्षकपदी कायम राहिल्यास मला आणि संघाला आनंद होईल. क्रिकेट सल्लागार समितीनं याबाबत माझ्याकडे मत मागितलेले नाही आणि ही प्रक्रिया कशी पार पाडेल, हेही मला माहीत नाही. पण, सल्लागार समितीनं माझं मत विचारल्यास, मी त्यांच्याशी चर्चा करीन. शास्त्रींसोबत संघ चांगली कामगिरी करत आहे आणि आम्ही एकमेकांचा आदर करतो. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळायला आवडेल.'' 

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजविराट कोहलीरवी शास्त्रीअजिंक्य रहाणे