Join us  

'कॅप्टन कोहली'ला नेमकं सुचवायचंय काय?; 'या' विधानामुळे सुरू झाली निवृत्तीची चर्चा

'कॅप्टन कोहली'ने केलेल्या एका विधानामुळे त्याचे चाहते आणि क्रिकेटप्रेमी चक्रावले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 11:04 AM

Open in App

गुवाहाटीः वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीनं १४० धावांची दणदणीत खेळी करून क्रिकेटमधील बऱ्याच 'दादा' लोकांना मागे टाकलं. या झंझावाती फलंदाजीबद्दल त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. तो स्वीकारताना 'कॅप्टन कोहली'ने केलेल्या एका विधानामुळे त्याचे चाहते आणि क्रिकेटप्रेमी चक्रावले आहेत. 

'क्रिकेटचा आनंद लुटण्यासाठी माझ्याकडे आता काही वर्षंच शिल्लक आहेत. देशासाठी खेळणं ही अत्युच्च सन्मानाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. हा खेळ फार गंभीरपणे न घेणं तुम्हाला परवडू शकत नाही. तुम्ही खेळाबद्दल प्रामाणिक असलं पाहिजे आणि मी तसंच राहण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही भारतासाठी खेळताय आणि ही संधी सगळ्यांना मिळत नाही', अशा भावना विराटनं व्यक्त केल्या. त्यातून त्याला नेमकं काय सूचित करायचंय, काही वर्षंच उरली आहेत म्हणजे काय?, यावरून क्रिकेट वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलंय.

विराट कोहली सुस्साट फॉर्ममध्ये आहे. भारतीय खेळपट्ट्यांवरच नव्हे, तर परदेशातल्या उसळत्या खेळपट्ट्यांवरही त्यानं तगडी फलंदाजी करून दाखवलीय. तो आला, खेळला आणि विक्रम रचला, असंच काहीसं चित्र सध्या पाहायला मिळतंय. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वनडेतही त्यानं सलामीवीर रोहित शर्मासोबत द्विशतकी भागीदारी रचली. १०७ चेंडूत २१ चौकार आणि दोन षटकारांची आतषबाजी करत त्यानं १४० धावा कुटल्या. विराटचं शतक आणि रोहितचं दीडशतक (नाबाद १५२ धावा) या जोरावर टीम इंडियानं विंडिजचा आठ विकेट्स राखून धुव्वा उडवला. त्यांचं ३२३ धावांचं लक्ष्य भारतानं ४२.१ षटकांतच गाठलं. 

विराट कोहलीनं वनडेतील ३६वं शतक साजरं करताना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला मागे टाकलं. सचिनला ३६ वनडे शतकं पूर्ण करण्यासाठी ३११ सामने खेळावे लागले होते. विराटनं २०४ सामन्यांतच हा पराक्रम केला. तसंच, सलग दुसऱ्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २००० धावांचा पल्ला पार करून त्यानं सचिनच्या विक्रमाशी बरोबरी केली. तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एका वर्षात 2000 धावा करण्याचा पराक्रम पाच वेळा केला होता. विराटनेही हा 'पंच' मारला आहे.

कोहलीच्या या 'विराट' कामगिरीनं चाहते खूश झाले असतानाच, त्यानं काहीसा भैरवीचा सूर लावून सगळ्यांनाच बुचकळ्यात टाकलंय. माझ्या कारकिर्दीत क्रिकेट एन्जॉय करण्यासाठी काही वर्षंच शिल्लक आहेत, या त्याच्या वाक्यानं अनेकांना धक्का बसलाय. अर्थात, वय, फॉर्म, स्टॅमिना, फिटनेस, नशीब या सगळ्याच गोष्टी विराटच्या बाजूने आहेत. त्यामुळे त्याच्या म्हणण्याचा अगदीच टोकाचा अर्थ काढण्याची गरज नसल्याचं क्रिकेट जाणकारांनी म्हटलंय. विराटची आजही क्षमता बघता, तो अजून  बरीच विक्रमांशी शिखरं सर करेल, असा विश्वासही जाणकारांनी व्यक्त केला. परंतु, विराट अचानक असं का म्हणाला, अशी शंकेची पाल चाहत्यांच्या मनात चुकचुकतेच आहे.  

 

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजविराट कोहलीरोहित शर्मासचिन तेंडुलकर