Join us  

India vs West Indies : विंडीजच्या फलंदाजाचा निर्धार, मोडणार विराट कोहली अन् रोहित शर्माचा विक्रम

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातला दुसरा वन डे सामना बुधवारी विशाखापट्टणम येथे होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 5:40 PM

Open in App

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातला दुसरा वन डे सामना बुधवारी विशाखापट्टणम येथे होणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्या विंडीजनं यजमानांना पराभवाची चव चाखवून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. टीम इंडियाच्या 288 धावांच्या लक्ष्याचा विंडीजनं सहज पाठलाग केला. शिमरोन हेटमायर आणि शे होप या दोघांनी शतकी खेळी करत विंडीजला 8 विकेट्स राखून विजय मिळवून दिला. त्यामुळे त्यांचे मनोबल चांगलेच उंचावले आहे. दुसऱ्या सामन्याच्या पूर्वसंध्येला विंडीजच्या शे होपनं टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांचा विक्रम मोडण्याचा निर्धार केला आहे.

पहिल्या सामन्यात शे होपनं नाबाद 102 धावांची खेळी केली. 2019मध्ये वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत शे होप 1225 धावांसह विराट कोहली ( 1292 धावा) आणि रोहित शर्मा ( 1268) यांच्यापाठोपाठ तिसऱ्या स्थानावर आहे. हे वर्ष संपण्यापूर्वी तीनही खेळाडू दोन वन डे सामने खेळणार आहेत आणि याच दोन सामन्यात सातत्यपूर्ण कामगिरी करून विराट- रोहितला मागे टाकण्याचा निर्धार होपनं केला आहे. तो म्हणाला,'' एक फलंदाज म्हणून संघासाठी जास्तीत जास्त योगदान देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो आणि आपल्या योगदानामुळे संघ जिंकल्यास त्याचे समाधान वेगळेच असते. दुसऱ्या सामन्यातही विराट, रोहितला झटपट बाद करण्यात आम्हाला यश मिळेल, अशी आशा करतो. त्यानंतर मी यंदाच्या वर्षात सर्वाधिक धावांच्या विक्रमाचा पाठलाग करेन आणि बाजीही मारेन.''

पहिल्या वन डे सामन्यात हेटमायर ( 139) आणि होप यांच्या शतकी खेळीमुळे आगामी इंडियन प्रीमिअर लीगच्या लिलावात सर्व मालकांचे लक्ष वेधले आहे. 19 डिसेंबरला कोलकाता येथे लिलाव होणार आहे. याबाबत होप म्हणाला,''पहिला संघाचा विजय आणि त्यानंतर आयपीएल लिलाव. आम्ही येथे भारताविरुद्ध वन डे मालिका खेळण्यासाठी आलो आहोत. संघातील काही खेळाडू आयपीएल लिलावासाठी उत्सुक असतील, परंतु वन डे मालिका प्राधान्य आहे.''

आयपीएल लिलावात 332 खेळाडूंमधून 73 जणांची निवड केली जाणार आहे. रॉयल चॅलेंजर बंगळुरूनं ट्रेड विंडोत हेटमायरला रिलीज केले. 2018मध्ये त्यांनी 4.2 कोटीत त्याला आपल्या ताफ्यात घेतले होते.  

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजरोहित शर्माविराट कोहली