Join us  

India vs West Indie, 1st Test : विंडीजला धक्का; 'गब्बर'ची विकेट घेणाऱ्या गोलंदाजाची पहिल्या कसोटीतून माघार

भारत विरुद्ध वेस्ट इंडिजः भारताविरुद्धच्या पहिली कसोटी सुरू व्हायला अवघे काही तास शिल्लक असताना यजमान वेस्ट इंडिजला धक्का बसला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 11:49 AM

Open in App

अँटिग्वा, भारत विरुद्ध वेस्ट इंडिजः भारताविरुद्धच्या पहिली कसोटी सुरू व्हायला अवघे काही तास शिल्लक असताना यजमान वेस्ट इंडिजला धक्का बसला आहे. ट्वेंटी-20 मालिकेत शिखर धवन, मनिष पांडे आणि कृणाल पांड्या या प्रमुख फलंदाजांना माघारी पाठवणारा गोलंदाज किमो पॉल याला पहिल्या कसोटीतून माघार घ्यावी लागली आहे. अष्टपैलू पॉलच्या डाव्या पायाला दुखापत झाली आहे, त्यामुळे त्याने कसोटीतून माघार घेतली आहे. त्याच्या जागी संघात वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाने मिग्युएल कमिन्सला स्थान दिले आहे. पॉलचा संघात सहभाग कायम असणार आहे, कारण दुसऱ्या कसोटीत तो तंदुरुस्त होईल अशी मंडळाला अपेक्षा आहे.

'' किमो पॉलने पहिल्या कसोटीतून माघार घेतली आहे. त्याच्याजागी संघात कमिन्सला संधी देण्यात आली आहे. भारत A संघाविरुद्धच्या सराव सामन्यात कमिन्सने चांगली कामगिरी केली होती,''अशी माहिती वेस्ट इंडिजचे प्रशिक्षक फ्लोयड रेइफर यांनी दिली. 28 वर्षिय कमिन्सने तीन वर्षांपूर्वी भारताविरुद्धच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्या मालिकेत त्याने दुसऱ्या सामन्यात 102 धावा देत 9 विकेट्स घेतल्या होत्या. 6 बाद 48 ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती.  

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकाही जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेंतर्गत होणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ कसोटीचा वर्ल्ड कप जिंकण्याच्या निर्धारानेच मैदानावर उतरणार आहे. पण, हा कसोटीचा वर्ल्ड कप विजेता कसा ठरेल, त्याला किती गुण मिळतील आणि भारतीय संघ अव्वल स्थान कसा पटकावेल, हे सर्व जाणून घेऊया...

कशी होणार गुणांची विभागणी?आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत प्रत्येक मालिकेत 120 गुण देण्यात येणार आहेत. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांची मालिका होणार आहे. त्यामुळे 120 गुणांची दोन सामन्यांत विभागणी होईल. त्यानुसार विजयी संघाला 60 गुण मिळतील. सामना अनिर्णित राहिल्यास दोन्ही संघांना 20-20 गुण, तर बरोबरीत सुटल्यास प्रत्येकी 30-30 गुण दिले जातील. 

तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत विजयी संघाला 40 गुण मिळतील. अनिर्णित व बरोबरीच्या निकालांसाठी दोन्ही संघांना प्रत्येकी अनुक्रमे 13.3 व 20 गुण दिले जातील. 4 सामन्यांच्या मालिकेत विजयी संघ 30 गुण घेईल, तर अनिर्णित निकालासाठी 10 व बरोबरीच्या निकालासाठी 15 गुण मिळतील. पाच सामन्यांच्या मालिकेत विजयी संघ 24, अनिर्णित निकाल 8 आणि बरोबरीच्या निकालासाठी 12 गुण मिळतील.

कोण आहे अव्वल स्थानावर ?जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेंतर्गत आतापर्यंत तीन कसोटी सामने झाले. त्यात श्रीलंकेने 60 गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. अॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाने 1-0 अशा फरकाने आघाडी घेतली आहे. त्यामुळे ते 32 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. अॅशेस मालिकेतील दुसरा सामना अनिर्णित राहिल्याने इंग्लंडने खाते उघडले आहे आणि ते 8 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहेत.

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजवेस्ट इंडिज