- अयाझ मेमन
(संपादकीय सल्लागार)
भारताने दक्षिण आफ्रिकेत खूप शानदार एकदिवसीय मालिका विजय मिळवला. याआधी कधीही भारताने द. आफ्रिकेला त्यांच्याच देशात एकदिवसीय मालिकेत पराभूत केले नव्हते. भारताने या मालिकेत सलग तीन सामने जिंकल्यानंतर एक सामना गमावला आणि त्यानंतरचा सामना जिंकून मालिकेवर कब्जा केला. यावरून भारतीय संघाचे यजमानांवरील वर्चस्व दिसून येते. माझ्या मते आता भारतीय क्रिकेटमध्ये एक महत्त्वपूर्ण बदल होत आहे. कारण विश्वचषक स्पर्धेच्या दृष्टीने आखलेल्या योजना यशस्वीपणे पूर्ण होत असल्याचे दिसत असून यामध्ये आणखी सुधारणा करण्याचीही गरज आहे. पण असे असले तरी संघाची योग्य दिशेने वाटचाल सुरू आहे. गेल्या २६ वर्षांत भारताने द. आफ्रिकेत एकही मालिका जिंकली नसल्याने हा एक ऐतिहासिक क्षण आहे. त्याहून महत्त्वाचे म्हणजे जर योजना योग्यरीत्या आखल्या गेल्या असत्या आणि त्यांचा अचूक वापर झाला असता, तर कादाचित कसोटी मालिकेतही आपण बाजी मारली असती; आणि याची खंत भारतीय संघ तसेच बीसीसीआय दोघांनाही असेल. मुख्य म्हणजे कोणत्याही सरावाशिवाय १-२ असा कसोटी मालिकेचा निकाल लागल्याने, जर योग्य योजना आखली असती, तर नक्कीच भारताने इतिहास घडवला असता.
एकदिवसीय मालिकेतील खेळाडूंच्या कामगिरीबाबत म्हणायचे झाल्यास सर्वांत आघाडीवर असेल तो कर्णधार विराट कोहली. १००हून अधिक सरासरी राखताना कोहलीने आपला दर्जा सिद्ध केला. पाचव्या सामन्यात तो धावबाद झाला,
नाहीतर आणखी एक शतक त्याने झळकावले असते. पण दोन शतकांसह त्याने ज्या प्रकारे खेळ केला आणि जे नेतृत्व केले ते अप्रतिम होते. त्याच्याव्यतिरिक्त ‘स्पिन ट्विन्स’ लक्षवेधी ठरले. ज्या प्रकारे कसोटी मालिकेत वेगवान गोलंदाजांनी ६० बळी घेतले, त्याच प्रकारे एकदिवसीय मालिकेत युझवेंद्र चहल - कुलदीप यादव यांनी ३० बळी घेतले. एक प्रकारे त्यांनी फलंदाजांना आपल्या तालावरच नाचवले. विशेष म्हणजे यामध्ये हाशिम आमला, फाफ डुप्लेसिस आणि एबी डिव्हिलियर्स यांचाही समावेश आहे. त्यांनाही फिरकी गोलंदाजी समजली नाही. त्यामुळे रविचंद्रन आश्विन आणि रवींद्र जडेजा यांना एकदिवसीय संघाबाहेर बसविण्याचा निर्णय चुकीचा नव्हता हे स्पष्ट झाले आहे. विदेशी मैदानावर बळी घेण्याची क्षमता आपल्यामध्ये असल्याचे या दोन्ही युवा फिरकी गोलंदाजांनी सिद्ध केले जे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे आगामी इंग्लंड, आॅस्टेÑलिया किंवा विश्वचषक स्पर्धेत हे गोलंदाजी आक्रमण भारतासाठी योग्य ठरू शकेल.
संपूर्ण दौºयातील आतापर्यंतच्या कामगिरीवर नजर टाकल्यास कोहली आणि गोलंदाजांना वेगळे केले, तर फलंदाजांमध्ये काही उणिवा दिसून आल्या आहेत. शिखर धवनने एकदिवसीय मालिकेत चांगला खेळ केला. रोहित शर्माने पाचव्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावले. पण त्यांच्यामध्ये सातत्याचा अभाव आहे. धवन आणि रोहितने कसोटीमधील आपले स्थान गमावले. अजिंक्य रहाणेने अखेरच्या कसोटीमध्ये चांगली खेळी केली.
पण जर तुम्ही पाच गोलंदाज खेळवू इच्छित असाल, तर आघाडीच्या फलंदाजांकडून खूप धावांची अपेक्षा असते. नेमका यामध्येच भारतीय संघ मागे पडत आहे. ज्या प्रकारे घरच्या मैदानावर वाघासारखे खेळतात, त्याच प्रकारे विदेशातील मैदानावरही खेळण्याची अपेक्षा क्रिकेटचाहते भारतीय फलंदाजांकडून ठेवत आहेत. त्याशिवाय, महेंद्रसिंग धोनी ज्या प्रकारे फलंदाज म्हणून खेळला आहे, त्यावर प्रश्न निर्माण होत आहेत. सहाव्या-सातव्या क्रमांकावर खेळत असल्याने त्याच्याकडून उत्कृष्ट ‘फिनिशिंग’ची अपेक्षा असते. कारण जर का यामध्ये धोनी अपयशी ठरला, तर त्याचा मोठा परिणाम भारताच्या धावसंख्येवर दिसून येतो. त्यामुळे आगामी विश्वचषक स्पर्धेपर्यंतच्या प्रवासादरम्यान कर्णधार कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांना गांभीर्याने लक्ष द्यावे लागेल.