Join us  

India vs Pakistan: पाकिस्तानला नमवलं म्हणजे शर्यत संपलेली नाही

आता पाकिस्तानविरुद्धच्या लढतीचे टेन्शन आणि उत्सुकता संपली आहे. पण विश्वचषक जिंकण्याचे  आव्हान कायम आहे याची जाणीव टीम इंडियाला ठेवावी लागेल.

By बाळकृष्ण परब | Published: June 17, 2019 7:02 PM

Open in App

- बाळकृष्ण परब काहीही झालं तरी जिंकायचंच, असा कोट्यवधी क्रिकेटप्रेमींचा असलेला दबाव, मीडिया आणि सोशल मीडियावर सुरू असलेली शाब्दिक लढाई, त्यात पावसाने आणलेली अनिश्चितता या सर्वांवर लीलया मात करत भारतीय क्रिकेट संघाने रविवारी कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानवर वर्ल्डकपमधील सातवी स्ट्राइक केली. वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानला धूळ चारण्याची गेल्या तीन दशकांपासून सुरू असलेली परंपरा कायम राखली. रोहित शर्मा, विराट कोहली, लोकेश राहुल यांची दमदार फलंदाजी आणि विजय शंकर, कुलदीप यादव आणि हार्दिक पांड्या यांची भेदक गोलंदाजी याच्या जोरावर विराटसेनेने पाकिस्तानला चारीमुंड्या चीत केले. खरंतर यंदाच्या विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झाल्यापासून इंग्लंडमधल्या लहरी पावसाने खोडसाळपणा करत अनेक लढतींमध्ये खोडा घातला होता. अगदी भारताचाही न्यूझीलंडविरुद्धचा सामना पावसामुळे वाया गेला होता. त्यातच पाकिस्तानविरुद्धच्या लढतीतही पावसाचा व्यत्यय येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने क्रिकेटप्रेमींमध्ये चिंतेचे वातावरण होते. या लढतीत पावसाचा व्यत्यय येऊ नये म्हणून इकडे भारतात नवस सायास, यज्ञयाग सुरू झाले होते. मग ''अगर किसी चिज को दिल से चाहो तो पुरी कायनात उसे आपसे मिलानेकी कोशिश मे लग जाती है,'' या शाहरुख खानच्या डायलॉगप्रमाणे त्या वरुणराजालाही भारतीय क्रिकेटप्रेमींच्या भावनेची दखल घ्यावी लागली. मग त्याने मँचेस्टरमधली आपली हजेरी आखडती घेतली.एकीकडे वरुण राजाच्या कृपेमुळे सामन्याला वेळेत सुरुवात होणार हे निश्चित झाले तरी प्रतिस्पर्धी पाकिस्तानला कमकुवत समजण्याची जोखीम भारतीय संघ घेऊ शकत नव्हता. त्याचं कारण म्हणजे याच पाकिस्तानी संघाने विश्वचषकातील हॉट फेवरिट असलेल्या इंग्लंडचा पराभव केला होता. तर ऑस्ट्रेलियाच्याही नाकी दम आणला होता. त्यामुळे पाकिस्तानचा पेपर निकालानंतर वाटतोय तितका सोपा नक्कीच नव्हता. त्यातच नाणेफेकीचा कौल पाकिस्तानच्या बाजूने लागला. पण नाणेफेक गमावल्यानंतर मिळालेली प्रथम फलंदाजीची संधी भारताच्या पथ्यावर पडली. या संधीचा लाभ रोहित शर्मा, लोकेश राहुल विराट कोहली यांनी बॅटचा मुक्तहस्ते वापर करत उचलला. मोहम्मद आमीरचा अपवाद वगळता पाकिस्तानची उर्वरीत गोलंदाजी तशी दर्जाने गरीबच. त्यामुळे धावांची लयलूट झाली.

त्यात रोहित शर्मा तर काल नशिबाची साथ घेऊनच आला होता. पाकिस्तानी क्षेत्ररक्षकांच्या ढिसाळपणामुळे सुरुवातीलाच एक-दोनवेळा त्याला जीवदान मिळाले.  पत्नीने वटपौर्णिमेचा केलेला कडक उपवास रोहितला तारून गेला, अशी चर्चा काही क्रिकेटप्रेमी गमतीने करत होते. पण सुरुवातीचा अपवाद वगळता नंतरच्या खेळात मात्र रोहितने पाकिस्तानी गोलंदाजांवर हुकूमत राखली. त्याने केलेल्या चौफेर फटकेबाजीमुळे पाकिस्तानी गोलंदाजांनी लवकरच सरेंडर केले. त्याची फटकेबाजी पाहण्यासारखी होती. त्यात त्याने हसन अलीला पॉईंन्टच्या दिशेने ठोकलेला षटकार तर २००३ च्या विश्वचषकात सचिनने शोएब अख्तरला ठोकलेल्या षटकाराची आठवण करून गेला. रोहितने पाकिस्तानचा वेगवान आणि फिरकी गोलंदाजीचा तोफखाना उद्ध्वस्त केल्यानंतर संघाला तीनशेपार नेण्याचे काम कर्णधार विराट कोहली आणि हार्दिकने केले. विराटची फटकेबाजी ऐन रंगात आलेली असताना आलेला पाऊस आणि नंतर आमीरच्या उसळत्या चेंडूवर नाबाद असताना विराटने तंबूत परतण्याची घाई केली नसती तर भारताची मजल साडेतीनशेपार गेली असती. असो. पण ३३६ धावासुद्धा पाकिस्तानसाठी माऊंट एव्हरेस्टसारख्या होत्या. त्या आव्हानाच्या दिशेने वाटचाल करत असताना सुरुवातीलाच विजय शंकरने इमाम उल हकला टिपले. नंतर फखर झमान आणि बाबर आझमच्या शतकी भागीदारीने पाकिस्तानसाठी थोडीफार आस जागवली. पण  ती विझणाऱ्या दिव्याची फडफड ठरली. कुलदीप यादव आणि हार्दिक पांड्याने मधल्या षटकांमध्ये मधली फळी कापून काढत पाकिस्ताचा पराभव निश्चित केला. त्यानंतर पावसाने हजेरी लावत पाकिस्तानवरची ऑल आऊट होण्याची नामुष्की टाळली. पण तोपर्यंत विराटसेना पाकिस्तानविरुद्ध विश्वचषकातील सलग सातव्या विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचली होती. 

आता पाकिस्तानविरुद्धच्या लढतीचे टेन्शन आणि उत्सुकता संपली आहे. पण विश्वचषक जिंकण्याचे  आव्हान कायम आहे याची जाणीव टीम इंडियाला ठेवावी लागेल. वेस्ट इंडिज आणि इंग्लंड या दोन दादा संघांविरुद्धच्या आपल्या लढती अद्याप बाकी आहेत. पण तूर्तास टीम इंडिया आणि क्रिकेटप्रेमींना पाकिस्तानविरुद्धच्या विजयाचा आनंद लुटू द्या. कारण मैदान कुठलेही असो, पाकिस्तानला हरवण्यात जी मजा आहे ती कशातही नाही.

टॅग्स :भारत विरुद्ध पाकिस्तानवर्ल्ड कप 2019भारतीय क्रिकेट संघविराट कोहलीरोहित शर्मा