मँचेस्टर - जगभरातील क्रिकेट रसिकांचे लक्ष लागून राहिलेल्या विश्वचषकातील भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या लढतीत भारताच्या फलंदाजांनी पाकिस्तानी गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. रोहित शर्मा, विराट कोहली आणि लोकेश राहुल यांनी केलेल्या शानदार फलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने 50 षटकांमध्ये 336 धावा कुटल्या. दरम्यान, या लढतीत आक्रमक फलंदाजी करणारा भारताचा कर्णधार विराट कोहली अगदी विचित्र पद्धतीने बाद झाला. मात्र भारताचा डाव संपल्यानंतर आता विराटच्या बाद होण्याचीच चर्चा सुरू आहे.
पाकिस्तानी गोलंदाजांची धुलाई करत 65 चेंडूत 77 धावा ठोकणारा विराट कोहली 48 व्या षटकात मोहम्मद आमीरच्या गोलंदाजीवर बाद झाला. आमीरने टाकलेला षटकातील उसळता चेंडू विराटच्या डोक्यावरून यष्टीरक्षक सर्फराझ अहमदच्या हातात गेला, तिकडे आमीरने जोरदार अपील केले. पण पंचांनी काहीच प्रतिसाद दिला नाही. मात्र विराट कोहलीने पंचांकडे लक्ष न देता तंबूची वाट धरली.
![]()
मात्र विराट तंबूत परतल्यावर या टीव्हीवर आलेल्या रिप्लेमध्ये चेंडू विराटच्या बॅटला लागलाच नसल्याचे दिसून आले. त्यामुळे विराट नाबाद असतानाच घाईगडबडीने तंबूत का परतला याची चर्चा सुरू झाली. डावातील मोक्याच्या क्षणी विराट अशाप्रकारे माघारी परतल्याने भारताची धावगती मंदावली आणि 350 धावांचा टप्पा ओलांडण्याचे लक्ष्य समोर ठेवणाऱ्या भारतीय संघाला 336 धावांवरच समाधान मानावे लागले.