Join us  

Virat Kohli : विराट कोहली खूप थकलाय; आणखी एक मोठा निर्णय घेण्याच्या आहे तयारीत!

कोरोना व्हायरसमुळे खेळाडूंना सतत बायो बबलमध्ये रहावं लागतंय. त्यात टीम इंडिया सहा महिन्यांपासून एकामागून एक बायो बललमध्ये राहत आहेत. हे बबल खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी योग्य असले तरी मानसिकरितीनं थकवणारे आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2021 5:49 PM

Open in App

आम्ही माणसं आहोत. भरलं पेट्रोल अन् पळवली गाडी, तसं आमच्यासोबत नाही करता येणार. मागील ६ महिने खेळाडू आणि आम्ही सर्व बायो बबलमध्ये आहोत. मी मानसिकरित्या थकलोय, परंतु खेळाडूंमध्ये मानसिक व शारीरिक थकवा जाणवतोय, नामिबियाच्या सामन्यानंतर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री ( Ravi Shastri) यांनी व्यक्त केलेलं हे मत. कोरोना व्हायरसमुळे खेळाडूंना सतत बायो बबलमध्ये रहावं लागतंय. त्यात टीम इंडिया सहा महिन्यांपासून एकामागून एक बायो बललमध्ये राहत आहेत. हे बबल खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी योग्य असले तरी मानसिकरितीनं थकवणारे आहे. त्यामुळेच आगामी न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत टीम इंडियाच्या सीनियर खेळाडूंना विश्रांती दिली जाणार आहे. 

विराट कोहलीनं ( Virat Kohli) ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद सोडले आहे आणि १७ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या ट्वेंटी-२० मालिकेत रोहित शर्मा ( Rohit Sharma) कर्णधार आणि लोकेश राहुल ( KL Rahul) उप कर्णधार म्हणून दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशात विराट ट्वेंटी-२० मालिकेत विश्रांती घेणार आहे. पण, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतही विराट खेळणार नसल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. विराट खूप थकलाय आणि त्यामुळे तो न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून माघार घेण्याच्या तयारीत आहे. बायो बबल, मानसिक थकवा या सगळ्यातून त्याला ब्रेक हवा आहे. किवींविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीपूर्वी ( ३ डिसेंबर, मुंबई) विराट टीम इंडियाच्या ताफ्यात दाखल होईल, अशी बीसीसीआयला अपेक्षा आहे. पण, तो दोन्ही कसोटीतून विश्रांती घेण्याच्या विचारात आहे. तो थेट दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या ताफ्यात दाखल होईल.

InsideSport नं दिलेल्या वृत्तानुसार ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील नामिबियाविरुद्धच्या लढतीनंतर विराटनं बीसीसीआयकडे अतिरिक्त सुट्टी मागितली आहे. ''विराट कोहलीनं अतिरिक्त सुट्टी मागितली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत तो ताफ्यात दाखल होणे आम्हाला अपेक्षित आहे. त्याला ब्रेक मिळायलाच  हवा. त्यानं कसोटी कर्णधार म्हणून संघाला ऐतिहासिक यश मिळवून दिले आहेत. इंग्लंड दौऱ्यावर आम्ही २-१ अशी आघाडी घेतली आहे, परंतु आता त्याला त्याच्या फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करायचे आहे. त्यासाठी त्याला मोकळा वेळ मिळणं गरजेचं आहे. कुटुंबियांसोबत वेळ घालवण्याचा त्याला नक्की फायदा होईल,''असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं  InsideSport ला सांगितले. रोहित शर्माकडे कसोटी संघाचे नेतृत्व?ट्वेंटी-२० पाठोपाठ  कसोटी संघाचे नेतृत्वही रोहित शर्माकडे जाणार का, या प्रश्नावर बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं नकार दिला. कोहलीकडेच कसोटीचे कर्णधारपद राहिल आणि तो संघात परतल्यावर त्याच्याकडे नेतृत्वाची माळ सोपवली जाईल. त्याच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणे नेतृत्व सांभाळेल आणि रोहित उपकर्णधार असेल. ट्वेंटी-२०त रोहित कर्णधार असेल आणि लोकेश राहुलकडे उपकर्णधारपद असेल. 

टॅग्स :विराट कोहलीबीसीसीआयभारत विरुद्ध न्यूझीलंड
Open in App