वेलिंग्टन, भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारताविरुद्धच्या वन डे मालिकेत सपाटून मार खाल्ल्यानंतर यजमान न्यूझीलंड संघाचा ट्वेंटी-20 मालिकेत कमबॅक करण्याचा प्रयत्न आहे. मात्र, ही मालिका सुरू होण्यापूर्वीच न्यूझीलंड संघाला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या ट्वेंटी-20 स्पेशालिस्ट आणि सलामीवीर मार्टिन गुप्तील याने दुखापतीमुळे ट्वेंटी-20 मालिकेतून माघार घेतली आहे. दुखातपीमुळेच गुप्तीलला पाचव्या वन डे सामन्यात खेळता आले नव्हते. त्याच्या जागी संघात अष्टपैलू जेम्स निशॅमचा समावेश करण्यात आला आहे.
''दुर्दैवाने मार्टिन ट्वेंटी-20 मालिकेपूर्वी पूर्णपणे बरा होणे शक्य नाही. पाच दिवसात तीन सामने खेळणे, हे खूप थकवणारे आहे. मर्यादित षटकांच्या सामन्यांत मार्टिन हा आमचा प्रमुख खेळाडू आहे, परंतु आगामी वर्ल्ड कप स्पर्धा लक्षात घेता तो वेळेत तंदुरूस्त होणे गरजेचे आहे. त्याच्या जागी संगात जेम्सचा समावेश करण्यात आला आहे,'' अशी माहिती न्यूझीलंड संघाचे प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी दिली.
पाचव्या वन डे सामन्यासाठी मार्टिन तंदुरूस्त होईल अशी संघाला अपेक्षा होती, परंतु त्याला बाकावर बसावे लागले. त्याच्या जागी संघात कॉलीन मुन्रोने स्थान पटकावले. निशॅमला भारताविरुद्धच्या शेवटच्या दोन सामन्यांत खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने दोन विकेट आणि 44 धावांचे योगदान दिले. भारत विरुद्ध न्यूझीलंड ट्वेंटी-20 मालिकेला 6 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. त्यानंतर ऑकलंड व हॅमिल्टन येथे दोन ट्वेंटी-20 सामने होतील.