Join us  

India vs New Zealand T20 : भारतीय संघाला पाकच्या 'वर्ल्ड रेकॉर्ड'शी बरोबरी करण्याची संधी

India vs New Zealand T20: भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्धींचा रविवारी अनुक्रमे न्यूझीलंड व दक्षिण आफ्रिका यांच्याशी सामना झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2019 11:46 AM

Open in App

वेलिंग्टन, भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्धींचा रविवारी अनुक्रमे न्यूझीलंड व दक्षिण आफ्रिका यांच्याशी सामना झाला. भारतीय संघाने विजयाची चव चाखताना न्यूझीलंडविरुद्धची मालिका 4-1ने खिशात घातली, तर पाकिस्तानला नाट्यमय सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून हार मानावी लागली. या पराभवामुळे पाकिस्तानच्या 'वर्ल्ड रेकॉर्ड'ला ब्रेक लागला. आफ्रिकेने विजय मिळवून भारतीय संघाला त्या वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी करण्याची संधी दिली आहे. न्यूझीलंडविरुद्ध बुधवारपासून सुरू होणाऱ्या ट्वेंटी-20 मालिकेत वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी करण्याचा भारतीय संघाचा निर्धार असणार आहे.

आफ्रिकेच्या 188 धावांचा पाठलाग करताना बाबर आझम व हुसेन तालत यांनी दमदार फटकेबाजी करताना पाकिस्तानला विजयाच्या दिशेने कूच करून दिली. बाबर व हुसेन यांनी दुसऱ्या विकेटसाठी 102 धावांची भागीदारी केली. बाबरने 13 चौकार व एक षटकार खेचून 58 चेंडूंत 90 धावा चोपल्या, तर हुसेनने 41 चेंडूंत 55 धावा केल्या. त्यात 7 चौकार व 1 षटकाराचा समावेश होता. तरीही पाकिस्तानला 7 धावांनी हार मानावी लागली.  या पराभवाबरोबर पाकिस्तानला 0-2 अशा पिछाडीसह ट्वेंटी-20 मालिकेत पराभव पत्करावा लागला आहे. 2016 च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप नंतर पाकिस्तानचा हा पहिलाच ट्वेंटी-20 मालिका पराभव आहे. पाकिस्तानने सलग 11 ट्वेंटी-20 मालिका जिंकून वर्ल्ड रेकॉर्ड केला होता. त्यांना ट्वेंटी-20 मालिकेत 2016 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर पाकिस्तानने सलग 11 मालिका जिंकल्या.

भारतीय संघाला पाकिस्तानच्या या वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी करण्याची संधी आहे. भारताने मागील 10 ट्वेंटी-20 मालिकेत अपराजित्व राखले आहे. जुलै 2017 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या पराभवानंतर भारताने श्रीलंका (1-0), ऑस्ट्रेलिया ( 1-1), न्यूझीलंड ( 2-1), श्रीलंका ( 3-0), दक्षिण आफ्रिका ( 2-1), निदाहास तिरंगी मालिका, आयर्लंड ( 2-0), इंग्लंड ( 2-1), वेस्ट इंडिज ( 3-0) आणि ऑस्ट्रेलिया (1-1) या ट्वेंटी-20 मालिकेत अपराजित्व राखले. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्ध तीन ट्वेंटी-20 सामन्यांच्या मालिकेत विजय मिळवल्यास पाकिस्तानच्या सलग 11 ट्वेंटी-20 मालिकेत अपराजित्व राखण्याच्या वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी राखण्याची भारताला संधी आहे. 

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडपाकिस्तानद. आफ्रिका