Join us  

India vs New Zealand T20 : 'पांड्या' बंधूंना विक्रमाची संधी, हार्दिक व कृणाल प्रथमच एकत्र खेळणार?

India vs New Zealand T20: न्यूझीलंडविरुद्धची वन डे मालिका खिशात घातल्यानंतर भारतीय संघ बुधवारपासून सुरू होणाऱ्या ट्वेंटी-20 मालिकेसाठी सज्ज झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2019 12:59 PM

Open in App

वेलिंग्टन, भारत विरुद्ध न्यूझीलंड : न्यूझीलंडविरुद्धची वन डे मालिका खिशात घातल्यानंतर भारतीय संघ बुधवारपासून सुरू होणाऱ्या ट्वेंटी-20 मालिकेसाठी सज्ज झाला आहे. कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आल्यामुळे ट्वेंटी-20 मालिकेत रोहित शर्मा संघाचे नेतृत्व करणार आहे. ट्वेंटी-20 मालिकेत भारतीय संघात काही नवे चेहरेही दिसणार आहेत. त्यातील एक कृणाला पांड्याला पहिल्या सामन्यात खेळण्याची संधी मिळेल का, याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. हार्दिक पांड्याचे संघातील स्थान पक्के आहे आणि त्यात उद्याच्या सामन्यात कृणालला अंतिम अकरामध्ये खेळण्याची संधी मिळाल्यास पांड्या बंधूंच्या नावे एक विक्रमाची नोंद होईल. हार्दिक व कृणालही आंतरराष्ट्रीय सामन्यात एकत्र खेळण्यासाठी उत्सुक आहेत. 

हार्दिक व कृणाल कारकिर्दीत प्रथमच एकाच आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळण्याची शक्यता आहे. सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या हार्दिकचे संघातील स्थान पक्के आहे. कृणालही ट्वेंटी-20 मालिकेसाठी न्यूझीलंडमध्ये दाखल झाला आहे. पांड्या बंधूंनी मंगळवारी कसून सरावही केला आणि पहिल्या सामन्यात एकत्र खेळण्यासाठी ते आतूर झाले आहेत. तसे झाल्यास अमरनाथ व पठाण बंधूंनंतर भारताकडून एकाच आंतरराष्ट्रीय सामन्यात एकत्र खेळणारे ते तिसरे बंधू ठरतील. मोहिंदर आणि सुरिंदर अमरनाथ यांनी अनेक आंतरराष्ट्रीय सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांचे वडील लाला अमरनाथ हे भारताकडून कसोटीत शतक करणारे पहिले फलंदाज होते. 

इरफान व युसूफ पठाण हे 2009 च्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात प्रथमच एकत्र खेळले होते आणि त्या दोघांनी आठव्या विकेटसाठी 59 धावांची भागीदारी करताना भारताला विजय मिलवून दिला होता. योगायोग म्हणजे पठाण बंधू व पांड्या बंधू हे बडोद्याचे आहेत. युसूफ अजूनही बडोद्याकडून खेळतो, तर इरफान जम्मू-काश्मिरचे प्रतिनिधित्व करतो. 

कृणाल व हार्दिक यांना इंग्लंडमध्ये एकत्र खेळण्याची संधी होती, परंतु ट्वेंटी-20 सामन्यात तसे झाले नाही. कृणालने वेस्ट इंडिजविरुद्ध ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले, तर हार्दिकला दुखापतीमुळे त्या सामन्याला मुकावे लागले होते. त्यानंतर कृणाल ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेतही खेळला होता.  

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडहार्दिक पांड्या