वेलिंग्टन, भारत विरुद्ध न्यूझीलंड : न्यूझीलंड संघाने चौथ्या वन डे सामन्यात विजय मिळवून भारताचा विजयरथ रोखला. या विजयामुळे न्यूझीलंडचे मनोबल उंचावले आहे, परंतु त्यांची चिंता वाढवणारे वृत्त शनिवारी समोर आले आहे. न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गुप्तील पाचव्या आणि अंतिम सामन्याला मुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सराव सत्रात त्याला दुखापत झाली आणि न्यूझीलंड क्रिकेट मंडळानेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तिसऱ्या वन डेनंतर संघातून वगळण्यात आलेल्या कॉलिन मुन्रोला पुन्हा बोलावण्यात आले आहे.
भारताविरुद्धच्या मालिकेत गुप्तीलची कामगिरी समाधानकारक झालेली नाही. मुन्रोही अपयशी ठरला आहे. गुप्तीलने केवळ 47 धावा केल्या आहेत. धावा घेण्यासाठी चाचपडत असलेला गुप्तील आता दुखापतीमुळे सामन्यालाही मुकणार आहे. त्यामुळे मुन्रो रविवारी सलामीला येण्याची शक्यता आहे.
तिसऱ्या वन डे सामन्यानंतर मुन्रोला डच्चू देण्यात आला होता. त्याने तीन सामन्यांत केवळ 46 धावा केल्या होत्या. तो हेन्री निकोल्ससह सलामीला येऊ शकतो. न्यूझीलंडचा प्रमुख खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर गेला असताना भारताचा प्रमुख खेळाडू महेंद्रसिंग धोनी मात्र कमबॅक करणार आहे. पाचव्या सामन्यासाठी तो तंदुरुस्त झाला आहे.