हॅमिल्टन, भारत विरुद्ध न्यूझीलंड : ट्रेंट बोल्टचा भेदक मारा आणि त्याला अन्य गोलंदाजांकडून मिळालेली साथ याच्या जोरावर न्यूझीलंडने चौथ्या वन डे सामन्यात भारताला 8 विकेट राखून पराभूत केले. भारताचे 93 धावांचे माफक लक्ष्य न्यूझीलंडने 14.4 षटकांतच पूर्ण केले. हेन्री निकोल्स ( 30) आणि रॉस टेलर ( 37) यांनी किवींना विजय मिळवून दिला.
चौथ्या वन डे सामन्यात भारतीय फलंदाजांनी न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्ट व कॉलीन डी ग्रँडहोम यांच्यासमोर शरणागती पत्करली. भारताचा संपूर्ण संघ 92 धावांत तंबूत परतला. दहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला युजवेंद्र चहल ( 18*) हा या सामन्यात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. ट्रेंट बोल्टने सलग दहा षटकं टाकून 4 निर्धाव षटकांसह 21 धावा देताना पाच विकेट घेतल्या. त्याला कॉलीन डी ग्रँडहोमने ( 3/26) चांगली साथ दिली.
लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचेही दोन फलंदाज लवकर माघारी परतले. भुवनेश्वर कुमारने भारताला यश मिळवून दिले, परंतु त्याला अन्य गोलंदाजांकडून साजेशी साथ मिळाली नाही. हेन्री निकोल्स आणि रॉस टेलर यांनी न्यूझीलंडचा विजय पक्का केला. न्यूझीलंडने 8 विकेट राखून विजय मिळवला.