Join us  

India vs New Zealand 3rd ODI : कांगारुंपाठोपाठ किवींना धक्का; धोनीपेक्षाही भारी विराटचा विजयाचा 'टक्का'

India vs New Zealand 3rd ODI: महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने न्यूझीलंडमध्ये वन डे मालिका जिंकली होती आणि त्यानंतर दहा वर्षांनी हा पराक्रम विराट कोहलीनं केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 3:41 PM

Open in App

माऊंट मोनगानुई, भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारतीय संघाने सोमवारी विजयाची हॅटट्रिक साजरी केली. गोलंदाजांच्या प्रभावी माऱ्यानंतर रोहित शर्मा व विराट कोहली यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारताने सलग तिसऱ्या वन डे सामन्यात न्यूझीलंडला नमवले. या विजयासह भारतीय संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. 2009नंतर भारतीय संघाने प्रथमच न्यूझीलंडमध्ये वन डे मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने न्यूझीलंडमध्ये वन डे मालिका जिंकली होती आणि त्यानंतर दहा वर्षांनी हा पराक्रम कोहलीनं केला.244 धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा सलामीवीर शिखर धवन लवकर माघारी परतला, परंतु रोहित शर्मा व विराट कोहली यांनी तुफान फककेबाजी केली. त्यांनी रचलेल्या मजबूत पायावर अंबाती रायुडू व दिनेश कार्तिक यांनी विजयाचा कळस चढवला. या विजयाबरोबर कोहलीने कर्णधार म्हणून श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका व झिम्बाब्वे येथे वन डे मालिका जिंकल्या आहेत. कर्णधार म्हणून पहिल्या 63 सामन्यांत विजय मिळवणाऱ्या खेळाडूंमध्ये कोहलीने वेस्ट इंडिजचे दिग्गज सर व्ही. रिचर्ड व दक्षिण आफ्रिकेच्या हँसी क्रोनिए यांना मागे टाकले. कोहलीने कर्णधार म्हणून पहिल्या 63सामन्यांपैकी 47 सामने जिंकले आहेत. या विक्रमात क्लाईव्ह लॉईड व रिकी पाँटिंग हे 50 विजयांसह आघाडीवर आहेत.  परदेशात कमीतकमी दहा सामन्यांत विजय मिळवणाऱ्या कर्णधारांत कोहली अव्वल आहे. या विजयाच्या टक्केवारीचा विचार केल्यास कोहलीने 72.72 टक्के विजय मिळवले आहेत. पाकिस्तानचा सर्फराज अहमद 58.09 टक्क्यांसह दुसऱ्या स्थानावर आहे, तर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी या टक्केवारीत दहाव्या क्रमांकावर येतो. मात्रस कमीत कमी 25 सामन्यांत टक्केवारीच्या बाबतीत कोहली दुसऱ्या स्थानावर जातो. यात क्लाईव्ह लॉईड ( 64/84) 76.19 टक्क्यांसह अव्वल स्थानी आहेत. कोहली 74.60 टक्क्यांसह दुसऱ्या स्थानावर आहे. 

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडविराट कोहलीमहेंद्रसिंह धोनीबीसीसीआय