Join us  

India vs New Zealand, 2ndTest: न्यूझीलंडकडून भारताला व्हाईटवॉश; दुसऱ्या कसोटीसह मालिका जिंकली

एकदिवसीय मालिकेपाठोपाठ कसोटी मालिकेतही न्यूझीलंडचं निर्भेळ यश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2020 8:08 AM

Open in App

ख्राईस्टचर्च: टी२० मालिकेत ५-० असा पराभव पत्कराव्या लागलेल्या न्यूझीलंडनं एकदिवसीय मालिकेपाठोपाठ कसोटी मालिकेतही निर्भेळ यश मिळवलंय. ख्राईस्टचर्चमध्ये झालेल्या दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडनं ७ गडी राखून विजय मिळवला. भारतानं न्यूझीलंडला १३२ धावांचं आव्हान दिलं होतं. न्यूझीलंडच्या बिनीच्या जोडीनं शतकी सलामी देत संघाला भक्कम सुरुवात करुन दिली. न्यूझीलंडच्या दोन्ही सलामीवीरांनी अर्धशतकी खेळी केली. दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाच्या पहिल्याच सत्रात भारताचा डाव गुंडाळण्यात न्यूझीलंडला यश आलं. ६ बाद ९० धावसंख्येवरुन भारतानं आजच्या दिवसाची सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी नाबाद असलेल्या हनुमा विहारीला झेलबाद करत टीम साऊदीनं न्यूझीलंडला तिसऱ्या दिवसातलं पहिलं यश मिळवून दिलं. विहारी अवघ्या ९ धावांवर बाद झाला. यानंतर ट्रेंट बोल्टनं रिषभ पंतला ४ धावांवर माघारी धाडलं. मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह या तळाच्या फलंदाजांनादेखील दुहेरी धावसंख्या करता आली नाही. भारताचा डाव १२४ धावांमध्ये आटोपला.पहिल्या डावात न्यूझीलंडला २३५ धावांत गुंडाळणारे भारतीय गोलंदाज दुसऱ्या डावातही चांगली गोलंदाजी करुन कडवी झुंज देतील अशी अपेक्षा होती. मात्र न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी शतकी सलामी दिली. उमेश यादवनं टॉम लॅथमला बाद करत संघाला पहिलं यश मिळवून दिलं. लॅथम ५२ धावा काढून तंबूत परतला. त्यानंतर केन विल्यमसन अवघ्या ५ धावांवर बाद झाला. बुमराहनं त्याला झेलबाद केलं. सलामीवीर टॉम ब्लंडलनं अर्धशतक साजरं केलं. मात्र यानंतर उमेश यादवनं त्याला ५५ धावांवर माघारी धाडलं.वेलिंग्टनमध्ये झालेला पहिला कसोटी सामना १० गडी राखून जिंकणाऱ्या न्यूझीलंडनं  दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात भेदक गोलंदाजी केली. त्यामुळे भारतीय संघाचा डाव २४२ धावांत आटोपला. यानंतर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात केली होती. मात्र त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करत सामन्यात पुनरागमन केलं. भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या संघाला २३५ धावांवर रोखलं. त्यामुळे भारताला ७ धावांची माफक आघाडी मिळाली. भारतीय गोलंदाजांच्या चांगल्या कामगिरीवर फलंदाजांनी पाणी फेरलं. न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाज सपशेल अपयशी ठरले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, त्यावेळी भारताची अवस्था ६ बाद ९० अशी केविलवाणी होती. भारताच्या एकाही फलंदाजाला २५ च्या वर धावा करता आल्या नाहीत. ट्रेंट बोल्टनं ४, तर टीम साऊदीनं ३ फलंदाजांना माघारी धाडलं.  

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंड