Join us  

India vs New Zealand 2nd T20 : एका सामन्यात भारताने रचले तब्बल नऊ विक्रम

ही विक्रमांची ' नऊ 'लाई नेमकी आहे तरी काय, जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2019 5:35 PM

Open in App

ऑकलंड, भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारताने दुसऱ्या ट्वेन्टी-20 सामन्यात न्यूझीलंडवर सात विकेट्स राखून विजय मिळवला. या विजयासह भारताने या सामन्यात तब्बल 9 विक्रमांना गवसणी घातली आहे. ही विक्रमांची ' नऊ 'लाई नेमकी आहे तरी काय, जाणून घ्या...

भारताचे दुसऱ्या सामन्यातील नऊ विक्रम1. भारताचा न्यूझीलंडमधील हा पहिला ट्वेन्टी-20 विजय आहे. 2009पासून भारताला यापूर्वी एकदाही विजय मिळवता आला नव्हता.

2. आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये षटकारांचे शतक लगावणारा रोहित शर्मा हा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. या सामन्यात चार षटकार लगावत त्याने आतापर्यंत एकूण 102 षटकार लगावले आहेत. या यादीत ख्रिस गेल आणि मार्टीन गप्तीन संयुक्तरीत्या अव्वल स्थानावर आहेत.

3. आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम रोहितने आपल्या नावावर केला आहे. रोहितच्या नावावर 2288 धावा असून त्याने गप्तीलला (2272) पिछाडीवर टाकले आहे.

4. आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये  भारताकडून सर्वाधिक षटकार लगावण्याचा मानही रोहितने पटकावला आहे. आतापर्यंत एकाही भारताच्या खेळाडूला शंभर षटकार लगावता आलेले नाहीत. 

5. रोहित हा आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये  सर्वाधिक अर्धशतके लगावणारा फलंदाज ठरला आहे. रोहितच्या नावावर 20 अर्धशतकांपेक्षा जास्त खेळी आहेत. रोहितने यावेळी विराट कोहलीला (19) पिछाडीवर टाकले आहे.

6. कृणाल पंड्याने या सामन्यात तीन बळी मिळवत इतिहास रचला आहे. न्यूझीलंडमधील ट्वेन्टी-20 सामन्यांमध्ये तीन बळी मिळवणारा कृणाल हा पहिला गोलंदाज ठरला आहे.

7. कर्णधार म्हणून रोहितने सर्वात जास्त ट्वेन्टी-20 सामने जिंकण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. कोहलीने यापूर्वी 12 ट्वेन्टी-20 सामने जिंकले आहेत आणि आता रोहितने त्याच्याशी बरोबरी केली आहे.

8. भारताकडून ट्वेन्टी-20 सामन्यांत सर्वाधिक झेल पकडण्याच्या यादीत रोहितने (33) दुसरा क्रमांक पटकावला आहे. या यादीमध्ये पहिला क्रमांक सुरेश रैनाचा (42) आहे. 

9. रोहित आणि शिखर धवन यांनी या सामन्यांत 79 धावांची सलामी दिली. ट्वेन्टी-20 सामन्यांमध्ये सर्वाधिक अर्धशतकी सलामी देण्याच्या यादीमध्ये संयुक्तरीत्या अव्वल स्थान पटकावले आहे. न्यूझीलंडच्या केन विल्यमसन आणि मार्टीन गप्तील यांनी 11 वेळी अर्धशतकी सलामी दिली होती. रोहित आणि धवन यांनी या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडरोहित शर्माशिखर धवन