माऊंट माऊंगानुई, भारत विरुद्ध न्यूझीलंड : रोहित शर्मा व शिखर धवन यांनी दुसऱ्या वन डे सामन्यात न्यूझीलंडच्या गोलंदाजांची शाळा घेतली. रोहित व शिखर यांनी पहिल्या विकेटसाठी 154 धावांची भागीदारी करताना न्यूझीलंडवर विक्रम केला. त्यांची ही खेळी न्यूझीलंडमध्ये भारतीय फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी केलेली दुसरी सर्वोत्तम भागीदारी ठरली. या कामगिरीसह त्यांनी 25 वर्षांपूर्वीचा अजय जाडेजा व सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला.
रोहित, शिखरच्या खेळीतून तो प्रकर्षाने जाणवतही होता. दोघांनी अर्धशतक झळकावत शतकी भागीदारी केली. रोहितने षटकार खेचून कारकिर्दीतले 38 वे अर्धशतक झळकावले. त्यापाठोपाठ शिखरनेही 27वे अर्धशतक झळकावले. रोहित व शिखरची ही 14 वी शतकी भागीदारी ठरली. यासह या दोघांनी भारताकडून सर्वाधिक शकती भागीदारी करणाऱ्या जोडींमध्ये चौथे स्थान पटकावले. त्यांनी तेंडुलकर व सेहवाग यांचा 13 शतकी भागीदारींचा विक्रम मोडला.
रोहित व धवन यांनी 105 धावांचा पल्ला पार करताच एक विक्रम नावावर केला. न्यूझीलंडमध्ये भारतीय सलामीवीरांनी केलेली ही दुसरी सर्वोत्तम भागीदारी ठरली. त्यांनी तेंडुलकर व जाडेजा यांचा 105 घावांचा विक्रम मोडला. 154 धावांची भागीदारी करताच शिखर माघारी परतला. ट्रेंट बोल्टने त्याला माघारी पाठवले. शिखरने 67 चेंडूंत 9 चौकारांसह 66 धावा केल्या. न्यूझीलंडमध्ये पहिल्या विकेटसाठी सर्वाधिक नाबाद 201 धावांच्या भागीदारीचा विक्रम वीरेंद्र सेहवाग व गौतम गंभीर यांच्या नावावर आहे.
![]()