Join us  

India vs Ireland : 'कॅप्टन कूल का जवाब नही'; सामना न खेळताही धोनीनं जिंकली मनं

आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात धोनीला विश्रांती देण्यात आली होती. पण, प्लेइंग-11मध्ये नसतानाही त्यानं आपल्या 'कामगिरी'नं चाहत्यांची मनं जिंकली. 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2018 2:02 PM

Open in App

ड्युब्लिनः टीम इंडियाचा सगळ्यात यशस्वी कर्णधार, असं बिरूद मिरवणाऱ्या महेंद्रसिंह धोनीनं पुन्हा एकदा आपल्या वागण्यातून उदयोन्मुख क्रिकेटपटूंसाठी आदर्श घालून दिला आहे. आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात त्याला विश्रांती देण्यात आली होती. पण, प्लेइंग-11मध्ये नसतानाही त्यानं आपल्या 'कामगिरी'नं चाहत्यांची मनं जिंकली. 

सुरेश रैनानं पीचवरून पाण्यासाठी इशारा केल्यानंतर जे दृश्य दिसलं त्याने सगळेच चकित झाले. साक्षात महेंद्रसिंह धोनी आपली किट बॅग आणि पाण्याच्या बाटल्या घेऊन मैदानात उतरला आणि त्यानं रैनासह मनीष पांडेला पाणी दिलं. त्यातून धोनीचा साधेपणा पुन्हा दिसला. त्याचे पाय अजूनही जमिनीवर असल्याचं जाणवलं. जग जिंकलं तरी डोक्यात हवा जाऊ द्यायची नाही, ही शिकवण क्रिकेटमधील नवोदितांनी 'जंटलमन' धोनीकडून घ्यायला हवी. 

   'वॉटर बॉय'च्या भूमिकेत धोनी याआधीही दिसला होता. गेल्या वर्षी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सराव सामन्यात तो सहकाऱ्यांसाठी पाणी घेऊन आला होता. 

दरम्यान, आयर्लंडविरुद्धच्या टी-20 सामन्यात धोनीला विश्रांती दिली असली तरी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत दिनेश कार्तिकऐवजी तोच मैदानात उतरणार आहे. तिथेही तो यष्टिरक्षक-फलंदाजाची आपली कामगिरी चोख बजावेल, याबद्दल चाहत्यांच्या मनात कुठलीच शंका नाही. 

टी-20 तील सर्वात मोठा विजय 

भारताने दुसऱ्या ट्वेन्टी-20 सामन्यात आयर्लंडवर 143 धावांनी सहज मात केली. लोकेश राहुल आणि सुरेश रैना यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने प्रथम फलंदाजी करताना 213 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना आयर्लंडचा संघ अवघ्या 70 धावांत तंबूत परतला. भारताकडून फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि कुलदीप यांनी प्रत्येकी तीन बळी मिळवले. भारताचा हा ट्वेन्टी-20 क्रिकेटमधील सर्वात मोठा विजय आहे.

टॅग्स :महेंद्रसिंह धोनीभारत विरुद्ध इंग्लंडक्रिकेट