Join us  

India vs England : धोनीने सर केला विक्रमांचा शिखर, दी वॉल द्रविडलाही मागे टाकले

महेंद्रसिंग धोनी आणि विक्रम हे घट्ट समीकरण बनले आहे. याची प्रचिती इंग्लंडविरूद्धच्या दुस-या वन डे सामन्यात आली.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2018 3:29 PM

Open in App
ठळक मुद्दे300 झेल टिपणारा तो पहिला भारतीय तर चौथा यष्टीरक्षक बनला आहे.

लॉर्ड्स - महेंद्रसिंग धोनी आणि विक्रम हे घट्ट समीकरण बनले आहे. याची प्रचिती इंग्लंडविरूद्धच्या दुस-या वन डे सामन्यात आली. या लढतीत इंग्लंडने 86 धावांनी भारताला पराभव पत्करण्यास भाग पाडले. या सामन्यात धोनीने 59 चेंडूंत 37 धावांची संयमी खेळी केली. यासह त्याने वन डे क्रिकेटमध्ये 10 हजार धावांचा पल्लाही गाठला. याशिवाय धोनीच्या नावावर शनिवारी आणखी अनेक विक्रम नोंदवले गेले. सुरेश रैनाला बाद झाल्यानंतर धोनी फलंदाजीला आला. त्यावेळी भारताला विजयासाठी 113 चेंडूंत 168 धावांची आवश्यकता होती. धोनीने संयमी खेळ करून 37 धावांच्या खेळी दोन चौकार लगावले. पण, तो पराभव टाळू शकला नाही. भारताचा पराभव आणि धोनीच्या अपयशानंतरही हा सामना अविस्मरणीय ठरला. 14 वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दित धोनीने वन डे क्रिकेटमध्या दहा हजार धावांचा पल्ला गाठला. वन डे क्रिकेटमध्ये 10 हजार धावा करणारा तो बारावा फलंदाज ठरला. याआधी सचिन तेंडुलकर ( 18426), कुमार संगकारा (14234), रिकी पाँटिंग (14234), सनथ जयसुर्या ( 13430), महेला जयवर्धने (12650), इंझमाम-उल-हक (11739), जॅक कॅलिस (11579), सौरव गांगुली (11363), राहुल द्रविड ( 10899), ब्रायन लारा (10405), तिलकरत्ने दिलशान (10290) यांनी हा पल्ला पार केला आहे. यष्टीरक्षक म्हणून हा विक्रम करणारा तो कुमार संगकारानंतर (296 सामने) दुसरा खेळाडू ठरला. धोनीने 273 वन डे सामन्यांत हा पराक्रम केला आहे. तेंडुलकर, गांगुली आणि द्रविड यांच्यांनंतर दहा हजार धावा करणारा धोनी पाचवा भारतीय खेळाडू तर पहिला भारतीय यष्टीरक्षक ठरला आहे. दहा हजार धावा करणा-या जलद खेळाडूंमध्ये तो पाचवा फलंदाज आहे. या आकडेवारीत तेंडुलकर (269 सामने ), गांगुली (263), पाँटिंग (266) आण कॅलिस (272) हे अव्वल चौघे आहेत. या विक्रमात त्याने द्रविडला (287) पिछाडीवर टाकले. वयाच्या बाबतित हा पल्ला पार करणारा 37 वर्षे व 7 दिवसांचा धोनी हा श्रीलंकेच्या दिलशान आणि वेस्ट इंडिजच्या लारा यांच्या पाठोपाठ तिसरा वयस्कर खेळाडू आहे. धोनीने 10 हजार धावा करण्यासाठी 11321 चेंडूंचा सामना केला, तर जयसूर्याने 11269 चेंडूंत 10000 धावा केल्या.  कारकीर्दित 75 टक्के 5 व 6 व्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन 10004 धावा करणारा धोनी एकमेव खेळाडू आहे. हा विक्रम करण्यापूर्वी धोनीने आणखी एक विक्रम नावावर केला. 300 झेल टिपणारा तो पहिला भारतीय तर चौथा यष्टीरक्षक बनला आहे. वन डेत सर्वाधिक झेल घेणा-या यष्टीरक्षकांमध्ये ऑस्ट्रेलियाचा अॅडम गिलख्रिस्ट (417), दक्षिण आफ्रिकेचा मार्क बाऊचर (402) आणि श्रीलंकेचा संगकारा ( 383) आघाडीवर आहेत. 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडमहेंद्रसिंह धोनीक्रिकेटक्रीडा