लंडन : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला होता. या पराभवानंतर बऱ्याच जणांनी संघ निवडीवरही टीका केली आहे. वेस्ट इंडिजचे माजी महान वेगवान गोलंदाज मायकल होल्डिंग यांनी थेट विराट कोहलीच्या संघसमावेशाबद्दल प्रश्न उपस्थित केला आहे.
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात कोहलीच भारतासाठी तारणहार ठरला होता. पहिल्या डावात 149 आणि दुसऱ्या डावात 51 धावा करत त्याने भारताचा डाव सावरला होता. त्याच्या या खेळींमुळेच सामना चांगला रंगतदार झाला होता. पण तरीदेखील होल्डिंग यांनी त्याच्यावर का टीका केली आहे, याचे काहींना आश्चर्य वाटत आहे.
होल्डिंग यांनी यावेळी कोहलीच्या फलंदाजीवर टीका केलेली नाही तर त्याच्या नेतृत्त्वावर टीका केली आहे. भारताच्या पराभवामध्ये संघ निवडीचा मोठा वाटा आहे, असं होल्डिंग यांना वाटतं. जर पहिल्या कसोटी सामन्यासाठी चांगली संघ निवड झाली असती तर कदाचित सामन्याचा निकाल वेगळा लागू शकला असता, असे त्यांचे म्हणणे आहे.
होल्डिंग म्हणाले की, " पहिल्या सामन्यात चेतेश्वर पुजाराला वगळण्याचा निर्णय चुकीचा होता. पुजारा एक फलंदाजा म्हणून फारच उजवा आहे. तो सध्या फॉर्मात नाही म्हणून त्याला संघात स्थान दिले नाही, असे म्हटले जात आहे. पण हा निकष कोहलीलाही लावणार का? जर कोहली चांगल्या फॉर्मात नसेल तर त्याला संघातून वगळणा का? "