Join us  

विराट कोहलीवर बंदीची टांगती तलवार, पंचांशी हुज्जत घालणे महागात पडू शकते

India vs England Test series: Will Virat Kohli be banned? : दुसऱ्या कसोटीत कोहलीकडून काही चुका झाल्या. चुका झाल्यावरही पंचांशी वाद घातल्याचे अनेकांनी पाहिले. 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 7:56 AM

Open in App

चेन्नई : भारताने इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवून चार सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी केली. या विजयाचा आनंद साजरा करीत असताना संघाला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पंचांशी वारंवार हुज्जत घातल्याप्रकरणी कर्णधार विराट कोहलीवर बंदी येऊ शकते, असे संकेत मिळत आहेत. दुसऱ्या कसोटीत कोहलीकडून काही चुका झाल्या. चुका झाल्यावरही पंचांशी वाद घातल्याचे अनेकांनी पाहिले. तिसऱ्या पंचांच्या एका निर्णयावर कोहलीने सर्वांसमक्ष नाराजी व्यक्त केली; शिवाय मैदानी पंचांसोबत हुज्जत घातली. इंग्लंडच्या माजी खेळाडूंनी विराटच्या वागणुकी संदर्भात मत व्यक्त केले. पंचांनी किंवा इंग्लंडच्या खेळाडूंनी कोहलीची तक्रार सामनाधिकाऱ्यांकडे केली तर अशी कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सामन्यात धावताना कोहली खेळपट्टीवरील ‘डेंजर झोन’मध्ये आला होता. पंचांनी वॉर्निंग दिली त्या वेळीदेखील विराटने पंचांशी हुज्जत घातली. तिसऱ्या दिवशी अक्षर पटेलच्या तिसऱ्या षटकात पहिल्या चेंडूवर भारतीय खेळाडूंनी रुटविरुद्ध हा झेलबादचे जोरदार अपील केले. मैदानी पंचांनी अपील फेटाळले. भारताने डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला. तिसऱ्या पंचांनी व्हिडीओ पाहायला सुरुवात केली. त्या वेळी चेंडू कुठेही बॅटला लागला नसल्याचे निष्पन्न झाले.हा चेंडू ऑफ स्टम्पच्या बाहेर पडला होता. जो रुट हा पायचीत होत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत होते. पण, पंचांनी त्याला नाबाद ठरवले. कोहली या निर्णयावर चांगलाच भडकला. तिसऱ्या पंचांनी पायचीतचा योग्य निर्णय द्यायला हवा, असे त्याचे म्हणणे होते. विराटने बराच वेळ मैदानी पंचांशी वाद घातला होता.

संयम, दृढ निश्चयामुळे मिळाला विजय : कोहली- संयमी खेळी करीत दृढ निश्चयाच्या बळावर दुसरी कसोटी जिंकून मालिकेत बरोबरी साधली. सामन्यात नाणेफेकीचा कौलदेखील महत्त्वाचा नव्हता, अशी प्रतिक्रिया भारतीय कर्णधार विराट कोहली याने विजयानंतर व्यक्त केली. फिरकीला पोषक चेपॉकच्या खेळपट्टीवरील टीका निरर्थक असल्याचे विराटने म्हटले आहे.- फिरकीला अनुकूल तसेच उसळी घेणारी खेळपट्टी पाहून विचलित झालो नाही. संयमाने खेळून ६०० वर धावा काढल्या. इतक्या धावा काढल्या की गोलंदाज आपले काम करतील, याची खात्री होती. या खेळपट्टीवर नाणेफेकीचा कौल तितका महत्त्वपूर्ण नव्हताच,’ असे विराटने सांगितले.- प्रेक्षकांपुढे खेळताना आमच्या उत्साहात भर पडल्याचे सांगून विराट म्हणाला, ‘पहिल्या सामन्यात प्रेक्षकांची उणीव जाणवली होती. चाहत्यांच्या प्रोत्साहनामुळे विजय आणखी सोपा होतो, अशी आमची भावना आहे.’ विराटने ऋषभ पंत याच्या कामगिरीचेही कौतुक केले. 

टॅग्स :विराट कोहलीभारत विरुद्ध इंग्लंड