Join us

India vs England Test: फलंदाजांच्या हाराकिरीपुढे गोलंदाजांची 'हिरोगिरी' विसरू नका!

By स्वदेश घाणेकर | Updated: September 6, 2018 09:31 IST

Open in App

- स्वदेश घाणेकर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचा भ्रमाचा भोपळा इंग्लंडमध्ये फुटला. पाच सामन्यांची कसोटी मालिका भारताने चौथ्या सामन्यातच यजमानांना भेट दिली. या मालिकेतील भारतीय संघाचे अपयश लपण्यासारखे नाहीच आहे. पण ते अपयश दाखवताना गोलंदाजांची भरीव कामगिरी झाकोळली जात आहे, याची कुणाला जाणीवच राहिलेली नाही. 

इंग्लंडमध्ये भारतीय संघाला ६१ कसोटी सामन्यांपैकी केवळ ७ सामने जिंकता आलेले आहेत. उसळत्या व वेगाने दिशा बदलणाऱ्या चेंडूवर भारतीय फलंदाज ( काही अपवाद वगळता) यशस्वी झालेच नाही. त्यामुळे भारताने येथे मालिका गमावली यात नवं ते काय? फलंदाजाचे अपयश हे इंग्लंड खेळपट्टीवरील नेहमीचेच रडगाणे झालेले आहे. हा पण भारतीय खेळपट्टीवर मर्दुमकी गाजवणारे हे फलंदाज ज्या पध्दतीने या मालिकेत खेळले ते निंदनीयच आहे. 

गोलंदाज इशांत शर्मा, मोहम्मद शमी, आर अश्विन, जस्प्रीत बुमरा, उमेश यादव, हार्दिक पांड्या यांनी आपले कौशल्य पणाला लावून भारताच्या विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. शर्माने अनेक विक्रमही मोडले. विक्रमांच्या बाबतीत बुमरा व पांड्याही मागे नाहीत. पण फलंदाजांच्या अपयशामुळे संघ हरला आणि गोलंदाजांची कामगिरी झाकोळली. मालिकेतील चार सामने झाले आहेत आणि त्यात सहावेळा भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडचा संपूर्ण संघ माघारी धाडला. १९८६ नंतर भारतीय गोलंदाजांना प्रथमच अशी कामगिरी करता आली आहे. त्यात आपला हुकुमी एक्का भुवनेश्वर कुमार संघात नसताना भारतीय गोलंदाजांकडून अशी कामगिरी होणे म्हणजे उल्लेखनीयच, म्हणावी लागेल. या मालिकेत चार सामन्यांत भारतीय गोलंदाजांनी ६७ विकेट घेतल्या. पाचवा सामना झाल्यानंतर यात आणखी भर पडेल, परंतु इंग्लंडमध्ये त्यांच्याचविरुद्ध भारतीय गोलंदाजांनी केलेली ही आत्तापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. इंग्लंडमधील ही भारताची १८ वी कसोटी मालिका आहे आणि त्यात केवळ तीन वेळाच भारतीय गोलंदाजांना ६० विकेट घेता आल्या आहेत. १९८६ आणि २०१४ मध्ये भारतीय गोलंदाजांनी ६० विकेट घेतल्या होत्या. त्यानंतर या  मालिकेत ६७ विकेट घेतल्या आहेत. 

एखादी बाजू कमकुवत झाली की शरिराच्या अन्य ठणठणीत असलेल्या अवयवांकडे दुर्लक्ष होते, भारतीय संघाच्या बाबतीत असेच झाले आहे. पण अपयशातही सकारात्मक गोष्ट दडलेली असते आणि त्याचे संगोपन केल्यास ती भविष्यासाठी ती कामी येऊ शकते.  त्यामुळे कमकुवत बाजूचा उवापोह करताना बळकट बाजूकडे दुर्लक्ष केल्यास तिही कोमेजून जाईल.. मग भारतीय संघावर पुढचे पाठे अन् मागच... असं म्हणण्याची वेळ येऊ नये म्हणजे झालं.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडइशांत शर्मामोहम्मद शामीजसप्रित बुमराहक्रिकेट