Join us  

India vs England : रविंद्र जडेजाचा पत्ता कापणार?; कॅप्टन कोहली शब्द पाळणार

इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठीच्या संघात कर्णधार विराट कोहली अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाचा पत्ता कट करून कुलदीप यादवला संधी देणार का, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 11:54 AM

Open in App

मुंबई - टी-20 पाठोपाठ वन डे मालिकेत भारताचा फिरकीपटू कुलदीप यादवने आपला प्रभाव पाडला आहे. इंग्लंडच्या फलंदाजांना त्याच्या फिरकीवर खेळणे अवघड जात आहे. त्याने पहिल्याच वन डे सामन्यात इंग्लंडच्या सहा फलंदाजांना बाद केले होते. त्यामुळे इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठीच्या संघात त्याची वर्णी लागण्याचे संकेत कर्णधार विराट कोहलीने दिले होते. त्या शब्दाला जागत कोहली अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाचा पत्ता कट करून कुलदीपला संधी देणार का, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. इंग्लंडविरूद्धच्या पाच सामन्यांच्या या मालिकेसाठी आज संघ निवड अपेक्षित आहे आणि त्यात जडेजाला डच्चू मिळण्याचे बोलले जात आहे. कुलदीपने गेल्या वर्षभरात केवळ दोनच कसोटी सामने खेळलले आहेत. त्याने 2017 मध्ये श्रीलंकेविरूद्धचा अखेरचा कसोटी सामना खेळला होता. त्या लढतीत जडेजावर आयसीसीने बंदी घातली होती आणि त्याएवजी कुलदीपला संधी मिळाली होती. दक्षिण आफ्रिका दौ-यावर अतिरिक्त जलदगती गोलंदाज खेळवण्यासाठी कुलदीपला वगळण्यात आले होते. आफ्रिका दौ-यावर गेलेल्या संघात आर. अश्विन आणि जडेजा यांचा समावेश होता. मात्र, अश्विन पहिल्या दोन कसोटीतच खेळला, तर जडेजाला संपूर्ण मालिकेत संधी मिळाली नाही. त्यावेळीच परदेशातील मालिकेत त्याला संधी मिळणार नसल्याचे संकेत मिळाले होते. अफगाणिस्तानविरूद्धच्या कसोटी मालिकेत त्याचा समावेश होता आणि त्याने सहा बळीही टिपले होते. मात्र, त्या कामगिरीचा इंग्लंड दौ-यासाठी विचार केला जाईल, अशी शक्यता कमीच आहे. कुलदीपने टी-20 पाठोपाठ वन डे मालिकेत आपली छाप पाडली आहे. त्यामुळे आगामी कसोटी मालिकेसाठी त्याच्या नावाचा विचार केला जात आहे. कुलदीपची निवड झाल्यास अंतिम अकरा खेळाडूंमध्ये अश्विनएवजी त्याचेच नाव आघाडीवर असेल. भारतासाठी एक आनंदाची गोष्ट म्हणजे मोहम्मद शमी या मालिकेत जलदगती गोलंदाजीचा भार पेलण्यासाठी तंदुरूस्त आहे. अफगाणिस्तानविरूद्धच्या कसोटीतून त्याला वगळण्यात आले होते. 

टॅग्स :रवींद्र जडेजाभारत विरुद्ध इंग्लंडक्रिकेटक्रीडा