Join us

India vs England 1st Test: पहिल्या पेपरमध्ये विराट पास बाकीचे फेल!

India vs England 1st Test: इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत इंग्लिश गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर भारतीय फलंदाजांची दाणादाण उडाली. पण याला भारताचा कर्णधार विराट कोहली मात्र अपवाद ठरला.

By बाळकृष्ण परब | Updated: August 3, 2018 09:17 IST

Open in App

खेळपट्टीवर थोडीशी हिरवळ आणि चेंडू हवेत भिरभिरू लागल्यावर भारतीय फलंदाजांची पळापळ होणे हे काही नवे नाही. त्यामुळेच इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका सुरू झाल्यावर यजमानांच्या वेगवान आक्रमणाचा सामना कोण करणार, असा प्रश्न विचारला जाऊ लागला होता. अशा परिस्थितीत एजबेस्टनमध्ये सुरू झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत इंग्लिश गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर भारतीय फलंदाजांची दाणादाण उडाली. पण याला भारताचा कर्णधार विराट कोहली मात्र अपवाद ठरला. इतर फलंदाजांना जिथे जेमतेम 25 धावा काढणे कठीण झाले होते तिथे विराटने कठीण परिस्थितीत 149 धावांची सर्वांगसुंदर खेळी साकारली. 

एकीकडे इंग्लंडच्या कुरन, अँडरसन, स्टोक्स वगैरे मुलूखमैदानी तोफांसमोर इतर फलंदाज धडाधड धारातीर्थी पडत असताना विराट खेळपट्टीवर पाय रोवून उभा राहिला. नुसता उभाच राहिला नाही तर त्याने इंग्लिश आक्रमणाला थोपवत त्यांच्यावर जोरदार प्रतिहल्ला केला. गेल्या इंग्लंड दौऱ्यात तो अपयशी ठरलेला असल्याने यावेळीही त्याचीच पुनरावृत्ती होईल, अँडरसन आणि ब्रॉडची जोडगोळी त्याला त्रास देईल, अशा पुड्या सोडल्या जात होत्या. पण या सर्वांच्या नाकावर टिच्चून विराट खेळला. नुसता खेळला नाही तर त्याने आपला क्लास दाखवला. इंग्लंडमधील पहिल्या पेपरात तो पैकीच्या पैकी आणि वर अधिकचे ग्रेस मार्क घेऊन पास झाला. बाकीच्यांना मात्र पास होण्यापुरत्याही धावा करता आल्या नाहीत. 

खरंतर परिस्थिती अगदीच प्रतिकूल होती. अँडरसन आणि ब्रॉडचा धसका घेणाऱ्या भारतीय फलंदाजांना कुरनचे चुरण महागात पडले. अर्धशतकी सलामीनंतर भारताचे फलंदाज झटपट माघारी परतल्याने भारताचा डाव अडचणीत आला होता. अशा परिस्थितीत मैदानावर आलेल्या विराटचा शून्यावर असताना झेल उडाला. मात्र त्याला जीवदान मिळालं. त्यानंतरही अँडरसन, कुरन, स्टोक्स यांनी त्याची परीक्षा घेतली. पण तो टिच्चून उभा राहिला. आक्रमणाऐवजी बचावाला प्राधान्य देत एकेक धाव जोडून खेळपट्टीवर स्थिरावला.  दुसरीकडून इतर फलंदाजांचे घालीन लोटांगण सुरूच होते. पण विराटने तळाच्या फलंदाजांना हाताशी धरत मोठी आघाडी घेण्याचे यजमानांचे मनसुबे धुळीस मिळवले. भारताच्या डावातील सर्वात मोठी 57 धावांची भागीदारी दहाव्या विकेटसाठी केली गेली. या भागीदारीतील जवळपास 56 धावा विराटने फटकावल्या होत्या. यावरून त्याच्या खेळीचे महत्त्व समजून येते.

विराटच्या या जिगरबाज खेळीमुळेच भारताचे पहिल्या कसोटीमधील आव्हान कायम राहिलेय. पहिल्या कसोटीमधील पहिल्याच डावात विराटने कर्णधार म्हणून आपली चोख बजावल्याने इतर सहकाऱ्यांनाही चांगली कामगिरी करून दाखवावी लागणार आहे. विराटच्या या खेळीने 2003/04 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सौरव गांगुलीने पहिल्याच कसोटीत प्रतिकूल परिस्थितीत केलेल्या शतकी खेळीच्या आठवणी जाग्या झाल्या. दादाची ती शतकी खेळी संघसहकाऱ्यांचा हुरूप वाढवणारी ठरली होती. त्यानंतर त्या मालिकेत काय घडले हा आता इतिहास बनला आहे. आताही विराटने फटकावलेले हे शतक भारतीय फलंदाज आणि संघाचा आत्मविश्वास वाढवणारे ठरेल, अशी अपेक्षा बाळगण्यास हरकत नाही. तसे झाले तर मालिका संपल्यानंतर गांगुलीप्रमाणे शर्ट गरगरवून इंग्रजांना डिवचण्याची संधी त्यालाही मिळेल.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडविराट कोहली