Join us  

India VS England: गुलाबी चेंडूवर दोन्ही संघ दावेदार; विजयी आघाडी घेण्यास भारत अन् इंग्लंड प्रयत्नशील

दिवसरात्र कसोटी आजपासून; विजयी आघाडी घेण्यास भारत आणि इंग्लंड प्रयत्नशील

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 12:28 AM

Open in App

अहमदाबाद : दुसरा कसोटी सामना मोठ्या फरकाने जिंकणाऱ्या भारतीय संघाला इंग्लंडविरुद्ध आज बुधवारपासून येथे खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या दिवसरात्र कसोटीत मोटेराच्या नव्या खेळपट्टीवर विजय मिळविण्यासाठी गुलाबी चेंडूवर किमया साधण्याचे तंत्र शोधावे लागणार आहे.

अनेक ऐतिहासिक कामगिरीचा साक्षीदार असलेल्या सरदार पटेल स्टेडियमचे अलीकडे नूतनीकरण झाले आहे. पाहताक्षणी भव्य दिसणाऱ्या या स्टेडियमच्या नव्या खेळपट्टीवर हा पहिला कसोटी सामना असेल. विराट कोहलीच्या संघाला मोठा लाभ मिळेल, असे मानण्याचे कारण नाही. येथे फिरकी प्रभावी ठरावी आणि २-१ अशी विजयी आघाडी मिळावी, असे भारतीय संघाचे प्रयत्न असतील.

अश्विन आणि अक्षर पटेल यांच्यासारख्या फिरकीपटूंना मदत मिळेल, अशी खेळपट्टी हवी, अशी मागणी रोहित शर्मा याने याआधीच केली. यात काहीच वावगे नाही. ज्यो रुटदेखील हेडिंग्ले किंवा ओल्ड ट्रॅफोर्ड मैदानावर पसंतीच्या खेळपट्ट्यांची मागणी करतो. सूर्य मावळतीला असताना उभय संघाचे फलंदाज आव्हान कसे पेलवतील, यावर विजयाचे पारडे अवलंबून असेल.

प्रतिस्पर्धी गोलंदाज जेम्स अँडरसनच्या मते याच कालावधीत चेंडू अधिक स्विंग होईल. अशावेळी एसजी गुलाबी चेंडूवरील अधिक पॉलिश अश्विन आणि अक्षर यांच्यासाठी डोकेदुखी ठरणार? या दोघांनी चेपॉकवर इंग्लिश फलंदाजांना दोन दिवसात गुडघे टेकायला लावले होते. येथे सामना दुपारी सुरू होणार असल्याने अखेरच्या सत्रात दवबिंदूंची भूमिकादेखील निर्णायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. रात्री फिरकीपटूंसाठी चेंडूवर पकड निर्माण करणे कठीण होईल. काही गोष्टींची माहिती नसल्यामुळे उभय कर्णधार सामन्याबाबत भाकीत करणे टाळत आले आहेत. ‘गुलाबी चेंडूने नव्या मैदानावर खेळणार असल्याने काय उपाययोजना कराव्या लागतील,’ हे माहीत नसल्याचे सोमवारी ईशांत शर्माने सांगितलेच आहे.

उमेश यादव फिटनेसमध्ये यशस्वी झाला आहे. अशावेळी कुलदीप यादव बाहेर बसू शकतो. उमेश आणि ईशांत यांनी कोलकाता येथे एकमेव दिवस -रात्र कसोटीत सहा सत्रात बांगला देश संघाला दोनदा बाद केले होते. तथापि इंग्लंड संघात ज्यो रुट, बेन स्टोक्स, जाॅनी बेयरेस्टॉ असेे दिग्गज आहेत. भारताने गोलंदाजांवरील भार कमी करण्यासाठी हार्दिक पांड्याला संधी देण्याचे ठरवले आहे; पण तो गोलंदाजी करेल का, हा प्रश्न आहे. रोटेशन धोरणानुसार मोईन अली मायदेशी परतल्यामुळे इंग्लंडच्या फिरकीची धुरा डोम बेस आणि जॅक लीच यांच्या खांद्यावर असेल. दुसरीकडे अँडरसन आणि जोफ्रा आर्चर यांच्यासोबत स्टुअर्ट ब्रॉड आणि मार्क वूड यांच्यापैकी कोण खेळेल हे ठरलेले नाही. 

पीच रिपोर्ट...

नवे मैदान असल्याने खेळपट्टीबाबत अंदाज बांधणे कठीण आहे. जाणकारांच्या मते, सुरुवातीला येथे फलंदाजांना मदत मिळू शकेल. विद्युत प्रकाशात गुलाबी चेंडू हवेत अधिक फिरताना दिसेल. नाणेफेक जिंकताना फलंदाजी घेणे हा आदर्श निर्णय ठरेल.

वेदर रिपोर्ट...

दुपारचे तापमान २८ अंश सेल्सिअस इतके राहील. रात्रीच्या तापमानात गारवा असेल. पाच दिवस आकाश नीरभ्र राहील. पाऊस येण्याची कुठलीही शक्यता नाही.

ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार

  • सुनील गावसकर यांनी येथे दहा हजार धावा पूर्ण केल्या होत्या.
  • कपिल देव यांनी याच ठिकाणी ८३ धावात नऊ गडी बाद केले.
  • रिचर्ड हॅडलीचा सर्वाधिक गडी बाद करण्याचा रेकॉर्ड कपिल यांनी याच मैदानावर मोडीत काढला होता.
  • ईशांत शर्मा या मैदानावर शंभरावी कसोटी खेळण्यासाठी उतरणार असून, कपिल यांच्यानंतर अशी कामगिरी करणारा तो दुसरा वेगवान गोलंदाज बनेल.
  • सचिन तेंडुलकरने येथे स्वत:चे पहिले द्विशतक ठोकले होते.

रविचंद्रन अश्विन ४०० कसोटीबळींच्या उंबरठ्यावर आहे. त्याला सहा गडी बाद करीत येथे ही उपलब्धी मिळविण्याची संधी असेल.

उभय संघ यातून निवडणार

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), लोकेश राहुल, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), रिद्धिमान साहा (यष्टिरक्षक), आर. अश्विन, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वाॅशिंग्टन सुंदर, ईशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव.

इंग्लंड : ज्यो रूट (कर्णधार), जेम्स अँडरसन, जोफ्रा आर्चर, जॉनी बेयरस्टॉ, डोमिनिक बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स, जॉक क्रॉउली, बेन फॉक्स,डेन लॉरेंस, जॅक लीच, ओली पोप, डॉम सिबली, बेन स्टोक्स, ओली स्टोन, क्रिस वोक्स, मार्क वूड.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडविराट कोहली