Join us  

जेम्स अँडरसनची ऐतिहासिक भरारी! टीम इंडिया पडलीय भारी, पहिल्या डावात २५९ धावांची आघाडी

इंग्लंडच्या पहिल्या डावातील २१८ धावांच्या प्रत्युत्तरात यशस्वी जैस्वाल ( ५७) आणि रोहित शर्मा यांनी शतकी भागीदारी करून टीम इंडियाचा पाया मजबूत केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2024 9:51 AM

Open in App

India vs England 5th Test Live update  (  Marathi News  ) : भारतीय संघाने पाचव्या कसोटीत पहिल्या डावात मजबूत आघाडी घेतली आहे. रोहित शर्मा, शुबमन गिल यांच्या वैयक्तिक शतकं आणि यशस्वी जैस्वाल, सर्फराज खान व देवदत्त पड्डिकल यांच्या अर्धशतकाने इंग्लंडला झोडले. कुलदीप यादव व जसप्रीत बुमराह यांनी नवव्या विकेटसाठी ४९ धावा जोडून इंग्लंडची डोकेदुखी वाढवली. इंग्लंडचा गोलंदाज जेम्स अँडरसनने ही जोडी तोडून ऐतिहासिक भरारी घेतली. 

इंग्लंडच्या पहिल्या डावातील २१८ धावांच्या प्रत्युत्तरात यशस्वी जैस्वाल ( ५७) आणि रोहित शर्मा यांनी शतकी भागीदारी करून टीम इंडियाचा पाया मजबूत केला. त्यानंतर रोहित ( १०३) आणि शुबमन गिल ( ११०) यांनी शतकी खेळी करून संघाला आघाडी मिळवून दिली. रोहित व शुबमन यांनी २४४ चेंडूंत १७१ धावा जोडल्या. त्यापाठोपाठ सर्फराज खान ( ५६)  व देवदत्त पड्डिकल ( ६५) यांनी वादळी फटकेबाजी केली आणि १३२ चेंडूंत ९७ धावांची भागीदारी केली. ही दोघं बाद झाल्यावर आता डाव गुंडाळता येईल असे इंग्लंडला वाटले, परंतु कुलदीप यादव व जसप्रीत बुमराह यांनी ९व्या विकेटसाठी दमदार खेळ केला आणि दुसऱ्या दिवसअखेर भारताला ८ बाद ४७३ धावांपर्यंत पोहोचवले होते.  

तिसऱ्या दिवसाच्या सकाळच्या सत्रात या दोघांनी ४९ धावांची भागीदारी पूर्ण केली, जी या मालिकेतील ९व्या विकेटसाठी सर्वोत्तम ठरली. यापूर्वी बेन स्टोक्स व मार्क वूड यांनी हैदराबाद कसोटीत ४१ धावा जोडल्या होत्या. तिसऱ्या षटकात जेम्स अँडरसनने भारताला ९वा धक्का देताना कुलदीपला ३० ( ६९ चेंडू) धावांवर झेलबाद केले. अँडरसनची ही ७०० वी विकेट ठरली. कसोटीत ७०० विकेट्स घेणारा तो पहिला जलदगती गोलंदाज ठरला. मुथय्या मुरलीधरन ( ८००) व शेन वॉर्न ( ७०८) हे अँडरसनपेक्षा जास्त विकेट घेणारे गोलंदाज ठरले. शोएब बशीरने डावातील ५ विकेट्स पूर्ण करताना भारताचा पहिला डाव ४७७ धावांवर गुंडाळला. भारताने पहिल्या डावात २५९ धावांची आघाडी घेतली आहे. 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडजेम्स अँडरसनकुलदीप यादवजसप्रित बुमराह