Join us  

India vs England 4th Test: विराट कोहली, जेम्स अँडरसन यांच्यात विक्रमासाठी शर्यत

India vs England 4th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेचा चौथा सामना आजपासून साऊदम्पटन येथे सुरू होत आहे. तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघाने पाच सामन्यांच्या मालिकेतील आव्हान 1-2 असे कायम राखले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2018 11:13 AM

Open in App

साऊदम्पटनः भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेचा चौथा सामना आजपासून साऊदम्पटन येथे सुरू होत आहे. तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघाने पाच सामन्यांच्या मालिकेतील आव्हान 1-2 असे कायम राखले आहे. त्या विजयामुळे भारतीय खेळाडूंचे मनोबल चांगलेच उंचावले असून मालिकेत बरोबरी मिळवण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. पण, इंग्लंडही मालिका विजयासाठी आतुर आहे. हा सामना भारताचा कर्णधार विराट कोहली आणि इंग्लंडचा जलदगती गोलंदाज जेम्स अँडरसन यांच्यासाठी विशेष आहे. दोघांनाही या सामन्यात विक्रम करण्याची संधी आहे. 

या कसोटीत अनेक विक्रम नोंदवले जाऊ शकतात.. चला जाणून घेऊया त्या विक्रमांबद्दल1) विराट कोहलीला कसोटीतील 6000 धावा पूर्ण करण्यासाठी सहा धावांची आवश्यकता आहे. जर त्याने पहिल्याच डावात त्या केल्या, तर तो सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडू शकतो. सचिनने 120 डावांत 6000 धावा केल्या आहेत आणि कोहलीला 119व्या डावात हा पल्ला सर करण्याची संधी आहे. सर्वात जलद 6000 धावा करण्याच्या विक्रमात सर डॉन ब्रॅडमन ( 68 डाव) हे आघाडीवर आहेत, तर भारतीयांमध्ये सुनील गावस्कर (117 डाव) यांनी हा मान मिळवला आहे. 2) कर्णधार म्हणून 4000 धावांचे शिखर सर करण्यासाठी कोहलीला 104 धावांची आवश्यकता आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय कर्णधार, तर एकंदर नववा कर्णधार ठरेल. 3) विराट कोहलीने या मालिकेत सहा डावांमध्ये 440 धावा केल्या आहेत. इंग्लंड दौऱ्यात एका मालिकेत सर्वाधिक 602 धावा करण्याचा भारतीय फलंदाजाचा विक्रम राहुल द्रविडच्या नावावर आहे. तो मोडण्यासाठी विराटला 162 धावांची आवश्यकता आहे. 4) विराटने साऊदम्पटन कसोटी जिंकल्यास तो नबाव पतौडी यांच्या विक्रमाशी बरोबरी करेल. पतौडी यांनी 1968 मध्ये आशिया खंडाबाहेर तीन कसोटी विजय मिळवले आहेत. विराटच्या नेतृत्वाखाली भारताने जोहान्सबर्ग आणि नॉटिंगहॅम कसोटीत विजय मिळवले आहेत.  

5) कसोटी इतिहासात सर्वाधिक बळी घेणाऱ्या जलदगती गोलंदाजांमध्ये ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्ग्रा 563 विकेटसह आघाडीवर आहे. या विक्रम मोडण्यासाठी इंग्लंडच्या जेम्स अँडरसनला 7 विकेटची गरज आहे. त्याच्या नावावर 557 विकेट आहेत. 6) साऊदम्पटन येथे भारतीय संघ यापूर्वी 2014 मध्ये खेळला होता आणि त्या कसोटीत त्यांना 266 धावांनी पराभव पत्करावा लागला होता. इंग्लंडने येथे दोन सामने खेळले आहेत. 1996 मध्ये त्यांना श्रीलंकेविरूद्ध अनिर्णीत निकालावर समाधान मानावे लागले होते. 7)  250 कसोटी विकेटचा पल्ला गाठण्यासाठी भारताच्या इशांत शर्माला एका विकेटची गरज आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडक्रिकेटविराट कोहलीजेम्स अँडरसन