भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसरा सामना आजपासून ट्रेंट ब्रिज येथे खेळविण्यात येणार आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ ०-२ असा पिछाडीवर आहे आणि मालिका वाचवण्यासाठी त्यांना ट्रेंट ब्रिजवर विजय-पताका फडकवणे अनिवार्य आहे.
भारतीय फलंदाजांची कामगिरी पाहता हे शक्य होईल असे ठामपणे सांगताही येत नाही. त्यामुळे निकाल लागेपर्यंत आशेच्या हिंदोळ्यावर झुलण्यात काहीच हरकत नाही. गोलंदाजांनी आपली कामगिरी आत्तापर्यंत तरी चोख बजावली आहे. विराट कोहली आणि जस्प्रीत बुमरा यांची तंदुरुस्ती ही संघासाठी आशेचा किरण घेऊन आलेली बातमी म्हणावी लागेल. पण ही किरण विजयासाठी पुरेशी आहे का ?
भारताने २००७ च्या कसोटीत यजमान इंग्लंडवत सात विकेट राखून विजय मिळवला होता. इंग्लंडचा प्रमुख व अनुभवी फलंदाज ॲलेस्टर कूकला ट्रेंट ब्रिजवर फार चांगली कामगिरी करता आलेली नाही. मागील १७ डावांत त्याला २१.९३ च्या सरासरीने केवळ एका अर्धशतकासह ३५१ धावाच करता आल्या आहेत. भारतीय समर्थकांना ही जमेची बाजू वाटत असेल तर जरा थांबा, अन् पुढील आकड्यांवर नजर टाका... मग ठरवा ट्रेंट ब्रिज भारतासाठी लकी की अनलकी?
०१
इंग्लंडचा प्रमुख गोलंदाज जेम्स अँडरसनला भारताविरूद्ध शंभर विकेटचा पल्ला गाठण्यासाठी एका बळीची आवश्यकता आहे. एकाच संघाविरूद्ध विकेटचे शतक साजरे करणारा तो पहिला जलदगती गोलंदाज ठरेल.
१२
इंग्लंडचा आणखी एक गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडला ३००० कसोटी धावा पूर्ण करण्यासाठी १२ धावांची आवश्यकता आहे. ३००० धावा व ४०० विकेट अशी कामगिरी करणारा तो पाचवा खेळाडू ठरेल. याआधी कपिल देव, सर रिचर्ड हॅडली, शेन वॉर्न आणि शॉन पोलॉक यांनी हा दुहेरी पल्ला सर केला आहे.
६०
ट्रेंट ब्रिजवर अँडरसनने ९ कसोटी सामन्यांत १८.९५च्या सरासरीने ६० विकेट घेतल्या आहेत. या मैदानावरील गोलंदाजाची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. .
१९८
भारत आणि इंग्लंड २०१४ मध्ये अखेरचे ट्रेंट ब्रिजवर समोरासमोर आले होते. जो रूट ( १५४*) आणि अँडरसन (८१) यांनी दहाव्या विकेटसाठी विक्रमी १९८ धावांची भागीदारी केली होती.