नॉटिंगहॅम : इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेच्या सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांत अपयशी ठरल्यानंतर आपल्या फलंदाजीचे विश्लेषण केले. ज्यामुळे ट्रेंटब्रिजमध्ये काल ८१ धावांची खेळी करू शकलो, असे भारतीय संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याने म्हटले. रहाणेच्या अर्धशतकी खेळीशिवाय कर्णधार विराट कोहलीनेदेखील ९७ धावांची खेळी केली. ज्यामुळे भारताला पहिल्या दिवशी ६ बाद ३०७ धावा फटकावता आल्या.
रहाणे म्हणाला, ‘‘गेल्या कसोटी सामन्यानंतर मी ड्रेसिंगरूममध्ये बसून आपल्या चांगल्या खेळीचे विश्लेषण केले. मी त्या वेळेस कशी फलंदाजी केली होती, माझी मानसिकता कशी होती आणि त्या सामन्यांसाठी मी स्वत:ला कसे तयार केले होते, त्यामुळेच ८१ धावांची खेळी करू शकलो.’’ रहाणे या सामन्याआधी बर्मिंघम आणि लॉर्डस् कसोटी सामन्यात पूर्णपणे अपयशी ठरला होता.
भारतीय उपकर्णधार म्हणाला, ‘‘व्यावसायिक क्रिकेटपटू म्हणून तुम्हाला यश आणि अपयश या दोघांनाही सामोरे जावे लागते; परंतु आपली इच्छाशक्ती मजबूत असायला हवी. जर आपली मानसिकता आणि दृष्टिकोन योग्य असेल तर परिणाम चांगलेच होतील. मी पहिल्या दोन कसोटीनंतर हिंमत हरलो नाही. जर खराब चेंडू आला तर त्यावर धावा करेल याचा मला विश्वास होता. अंतिम परिणामांवर जास्त विचार केल्याने दबाव बनतो. माझे लक्ष्य एका वेळेस एक चेंडू खेळण्यावर होते. जेव्हा विराट आणि मी फलंदाजी करीत होतो तेव्हा आमचे लक्ष्य हे भागीदारी करणे होते आणि आम्ही जेव्हा स्थिर झालो तेव्हा आमचे लक्ष धावा करण्यावर होते. वास्तवत: ही भागीदारी आमच्यासाठी महत्त्वपूर्ण होती. आम्ही खराब चेंडूचा खूप फायदा घेतला.’’