- अयाझ मेमन
नॉटिंगहममध्ये भारत-इंग्लंड यांच्यात जो तिसरा कसोटी सामना खेळला जातोय त्याने गेल्या दोन्ही कसोटींपेक्षा वेगळे वळण घेतले आहे. यात उलटफेर पाहायला मिळत आहे. गेल्या सामन्यात भारतीय संघ ९० षटकेही खेळू शकला नव्हता आणि तीन दिवसांच्या आतच हा सामना गुंडाळला होता. येथे मात्र उलट चित्र दिसतेय. याचे कारणही जरा वेगळेच आहे. भारतीय फलंदाज दबावाखाली असल्याचे इंग्लंडचा कर्णधार ज्यो रुटला वाटले असेल, त्यामुळेच त्याने भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारताने ३२९ धावा केल्या. ज्यात विराटने ९७ धावा केल्या, अजिंक्य रहाणे हा सुद्धा फॉर्ममध्ये आला. त्याने ८१ धावा केल्या. या दोघांच्या योगदानामुळे भारताने मालिकेत पहिल्यांदाच ३००चा आकडा पार केला. हा आकडा मोठा नाही. परंतु, वातावरणात बदल झाल्याने चेंडू स्विंग होत आहे. त्यामुळे भारतीय गोलंदाजांना फायदा झाला. इंग्लंडवर दबाव वाढला आणि एकाच सत्रात इंग्लंडचे सर्व फलंदाज बाद झाले, तेही ३८.२ षटकांत. हे चित्र यासाठी सांगणे गरजेचे आहे; कारण आपण भारतीय फलंदाजांवर सर्व स्तरांवर टीका करीत होतो. भारतीय संघ इंग्लंडमध्ये खेळू शकत नाही, अशी जोरदार टीका होत होती. घरच्या मैदानावर आणि वातावरणात इंग्लंडचे फलंदाजही अपयशी ठरले. यावरून लक्षात येईल की ‘लेट स्विंग’ला खेळणे किती कठीण असते. नव्या पिढीत टी-२० क्रिकेटमुळे तांत्रिक बदल झालेला दिसून येतो. त्यांच्यात संयमही कमी आहे. बरेच कमी असे खेळाडू आहेत जे पूर्ण दिवस मैदानावर टिकतात. जुन्या काळात जसे विनू मंकड, विजय मर्चंट, सुनील गावसकर, राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर हे पूर्ण दिवस खेळायचे. मग ती खेळपट्टी चांगली असो किंवा खराब.
माझ्या मते, भारताने आतापर्यंत मोठी आघाडी घेतली आहे. ही आघाडी ४५०-५०० पर्यंत गेली तर फारच चांगले. हवामानात बदल झाला नाही तर भारतानेच हा सामना जिंकायला हवा. कारण इंग्लंडला खेळणे सोपे नसेल. चेंडू स्विंग होत असल्याने भारताला फायदा होईल. भारताने हा सामना जिंकला तर मालिका २-१ अशी होईल. तराजू दुसरीकडे झुकण्यास सुरू होईल. दोन कसोटी सामने आणखी आहेत. रवी शास्त्री, कोहलीच्या विरोधात बऱ्याच तक्रारी होत्या की ते खेळाडंूवर दबाव आणत आहेत. विराट आक्रमणाच्या बाता करतो; पण होत काहीच नाही. जिंकल्यास त्यावर पडदा पडेल. ही पाच कसोटी सामन्यांची मालिका असल्याने हा सामना जिंकल्यास मालिकेत रंगत येईल.
हार्दिक पांड्याने दाखवून दिले...
हार्दिक पांड्या हा संघात काय करतोय? असे टोमणे प्रसिद्ध समालोचक मायकल होल्डिंग यांनी मारले होते. त्याचे त्याने उत्तर दिले. इंग्लंडचे पाच फलंदाज तंबूत पाठवून आपण अष्टपैलू असल्याचे त्याने दाखवून दिले. ८-१० षटकांच्या स्पेलमध्ये त्याने इंग्लंडची कंबर मोडली. २४-२५ वर्षीय हा खेळाडू पहिल्यांदाच इंग्लंड दौºयावर गेला आहे. त्याला टी-२० आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळताना आपण पाहिले आहे. त्याचा हा सातवा किंवा आठवाच कसोटी सामना असेल. पहिल्यांदाच पाच बळी मिळवल्याने त्याचे मनोबल उंचावले असेल. त्यामुळे तो एक उत्कृष्ट अष्टपैलू बनू शकतो. फक्त थोडा संयम ठेवावा लागेल. काही खेळाडू हे लवकर शिकतात तर काहींना वेळ लागतो. विराटप्रमाणेच हार्दिकही त्याच प्रकारचा खेळाडू आहे.