भारताविरोधातील कसोटीत पाच बळी घेत इंग्लंडचा जेम्स अँडरसन लॉर्ड्सवर ९९बळी घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. आणखी एक बळी घेतल्यास तो एकाच मैदानावर शंभर बळी घेणारा दुसरा गोलंदाज बनेल. या आधी मुरलीधरन याने तीन मैदानांवर प्रत्येकी शंभर पेक्षा जास्त बळी मिळवले आहेत.
पावसाने व्यत्यय आणलेल्या कसोटी सामन्यात भारताचा डाव १०७ धावांवरच आटोपला. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज अँडरसनने इशांत शर्माला पायचीत पकडत भारताचा डाव संपवला. त्यासोबतच भारताचे सर्वात जास्त बळी घेण्याचा विक्रम त्याने नोंदवला. भारताविरोधातील हा त्याचा ९५ वा बळी ठरला.
भारताचे सर्वाधिक फलंदाज बाद करणा-या वेगवान गोलंदाजांच्या यादीत अँडरसनने पाकिस्तानच्या इम्रान खान (९४ बळी) यांना मागे टाकले. लॉर्ड्सवर 5 पेक्षा जास्त बळी घेण्याची कामगिरी त्याने सहाव्यांदा केली आहे. लॉर्ड्सवर सर्वात जास्त बळी घेणारा तो गोलंदाज आहे. त्यापाठोपाठ स्टुअर्ट ब्रॉड याने लॉर्ड्सवरील २१ कसोटीत ७९ बळी घेतले. अँडरसन याने २३ कसोटी सामन्यात ही कामगिरी केली आहे.
एकाच मैदानात सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनच्या नावावर आहे. त्याने कोलंबोतील एसएससी मैदानात १६६ बळी घेतले आहेत. त्यानेच कँडीच्या मैदानात ११७ आणि गालेच्या मैदानात १११ बळी घेतले आहेत. रंगना हेराथ यानेही गालेच्या मैदानात ९९ बळी घेतले आहे. आणखी एका बळीसह अँडरसन लॉर्ड्सवर बळींचे शतक पूर्ण करेल.