Join us  

India vs England 2nd Test: लॉर्ड्सवर भारत दोन फिरकीपटू खेळवणार?

India vs England 2nd Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना गुरूवारपासून लॉर्ड्सवर खेळवण्यात येणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2018 11:06 AM

Open in App

लंडन - भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना गुरूवारपासून लॉर्ड्सवर खेळवण्यात येणार आहे. येथील खेळपट्टी जलदगती गोलंदाजांसाठी फायद्याची असली तरी सध्या वाढलेल्या गरमीमुळे खेळपट्टी फिरकीपटूंसाठी पोषक ठरू शकते. हे लक्षात घेता भारतीय संघ या कसोटीत दोन फिरकीपटू खेळवण्याची शक्यता आहे.  आर अश्विनने संघातील जागा पक्की केली आहे. दुस-या जागेसाठी रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांच्यात चुरस रंगणार आहे. 

इंग्लंडमध्ये काही दिवसांपासून तापमान 32 डिग्रीच्या वर आहे. 1976नंतर प्रथमच इंग्लंडमध्ये असे तापमान झाले आहे आणि त्यामुळे खेळपट्टीवरील ओलावा कायम राखण्याचे आव्हान ग्राऊंड्समन यांना पेलावे लागणार आहे. अशा परिस्थितीत लॉर्ड्स कसोटीत दोन फिरकीपटू खेळवण्याचा सल्ला अनेक दिग्गज खेळाडूंनी दिला आहे. 

फिरकीपटू हे भारतीय संघाचे बलस्थान आहेत. एडबॅस्टन कसोटीत अनुकूल वातावरण असूनही भारताने एकच फिरकीपटू खेळवला होता. अनुभवी गोलंदाज हरभजन सिंगने त्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. त्याने लॉर्ड्स कसोटीत अश्विनच्या जोडीला कुलदीप यादवला संधी मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. यासाठी त्याने हार्दिक पांड्याला वगळण्याचा सल्ला दिला.  

तर फलंदाजांची फळी कमकुवत होईलभारताला अजूनही सलामीच्या फलंदाजांचा प्रश्न भेडसावत आहे. मुरली विजय आणि शिखर धवन यांना साजेशी कामगिरी करता आलेली नाही, तर चेतेश्वर पुजाराच्या जागी मधल्या फळीत संधी मिळालेला लोकेश राहुलही अपयशी ठरला. त्यात दोन फिरकीपटूंसाठी हार्दिकला बसवल्यास भारताची फलंदाजी अजून कमकुवत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडआर अश्विनरवींद्र जडेजाकुलदीप यादवक्रिकेटक्रीडा