Join us  

India vs England 1st Test: सचिन तेंडुलकरनंतर विराटने केला पराक्रम!

India vs England 1st Test: कर्णधार विराट कोहलीने एकहाती खिंड लढवत भारतीय संघाला संकटातून बाहेर काढले. इंग्लंडविरूध्दच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी विराटने वर्चस्व गाजवले.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2018 12:10 PM

Open in App

एडबॅस्टन - कर्णधार विराट कोहलीने एकहाती खिंड लढवत भारतीय संघाला संकटातून बाहेर काढले. इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी विराटने वर्चस्व गाजवले. त्याने २०१४ च्या अपयशाला मागे टाकून जगातील सर्वोत्तम फलंदाज असल्याचे सिद्ध केले. कोहलीने २२५ चेंडूत १४९ धावांची परिपक्व खेळी करताना इंग्लंड गोलंदाजीची लक्तरे वेशीला टांगली. या खेळीसह विराटने भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या विक्रमाशीही बरोबरी केली. विराटने गुरुवारी असे कोणकोणते विक्रम केले चला पाहूया... 

१) विराटचे हे २२ वे कसोटी शतक ठरले. यापैकी १२ शतक ही त्याने मायदेशी केली असून १० आशिया खंडाबाहेर झळकावली आहेत. इंग्लंडविरूद्ध त्याचे हे चौथे शतक. 

२) कर्णधार म्हणून त्याचे हे १५वे कसोटी शतक ठरले. यासह त्याने ऑस्ट्रेलियाचे स्टीव वॉ आणि अॅलन बॉर्डर यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. कर्णधार म्हणून सर्वाधिक शतक करणाऱ्या यादीत दक्षिण आफ्रिकेचा ग्रॅमी स्मिथ ( २५) आणि ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉंटिंग ( १९) आघाडीवर आहे. 

३) २०१८ मधील विराटचे हे दुसरे  आणि एडबॅस्टन येथील पहिलेच शतक. सचिन तेंडुलकरनंतर एडबॅस्टन येथे शतक ठोकणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. 

४) बांगलादेश, अफगाणिस्तान व आयर्लंड वगळता विराटने सर्व संघांविरूद्ध कसोटी शतक केले आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड यांचा समावेश आहे. 

५) सर डॉन ब्रॅडमन (६०.०४) यांच्यानंतर सर्वोत्तम सरासरीत विराटचा क्रमांक येतो. त्याने ५७.८९ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. 

६) १४९ धावांची खेळी ही विराटची इंग्लंडमधील सर्वोत्तम खेळी ठरली. यापूर्वी २७ जुलै २०१४ मध्ये केलेल्या ३९ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी होती. 

७) भारताच्या एकाही फलंदाजाला ३० धावांचा पल्ला ओलांडता आलेला नाही आणि विराटने १४९ धावा केल्या. अशा परिस्थितीत भारतीय फलंदाजाने केलेली ही दुसरी सर्वोत्तम खेळी ठरली. यापूर्वी व्ही व्ही एस लक्ष्मणने १९९९/०० च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर १६७ धावा केल्या होत्या. त्या डावात सौरभ गांगुलीच्या २५ धावा ही दुसरी सर्वोत्तम खेळी होती. 

८) भारत- इंग्लंड यांच्यातील कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्यांत विराट १९ व्या क्रमांकावर आहे. त्याने एकूण ११२६ धावा केल्या आहेत. मात्र त्याने मायकेल वॉन, रवी शास्त्री, चेतेश्वर पुजारा, जेफ्री बॉयकॉट आणि फारूख इंजिनियर यांना मागे टाकले. 

९) भारताच्या एकूण २७४ धावांच्या खेळीत विराटचा ५४.३७ टक्के वाटा आहे. ही दुसरी सर्वोत्तम टक्केवारी आहे. यापूर्वी महेंद्रसिंग धोनीने (८२) २०१४च्या इंग्लंडविरूद्धच्या ओव्हल कसोटीत भारताच्या एकूण १४८ धावांत ५५.४१ टक्के वाटा उचलला होता. 

१०) विराटने भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन याच्या विक्रमाशी बरोबरी केली. अझरुद्दीनने १९९०च्या इंग्लंड दौऱ्यात कर्णधार म्हणून पहिल्याच डावात १२१ धावा केल्या होत्या. 

टॅग्स :विराट कोहलीभारत विरुद्ध इंग्लंडसचिन तेंडूलकरक्रिकेटक्रीडा