India vs England 1st Test: चौथ्या दिवसअखेर कसोटीत रंगत कायम; भारतापुढे ४२० धावांचे लक्ष्य

India vs England 1st Test: अश्विनचा बळींचा षटकार, इंग्लंडचा दुसरा डाव १७८ धावात संपुष्टात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2021 06:34 AM2021-02-09T06:34:12+5:302021-02-09T07:37:13+5:30

whatsapp join usJoin us
India vs England 1st Test India needs 381 on final day England removes Rohit for 12 | India vs England 1st Test: चौथ्या दिवसअखेर कसोटीत रंगत कायम; भारतापुढे ४२० धावांचे लक्ष्य

India vs England 1st Test: चौथ्या दिवसअखेर कसोटीत रंगत कायम; भारतापुढे ४२० धावांचे लक्ष्य

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

चेन्नई : ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने घेतलेल्या सहा बळींच्या जोरावर इंग्लंडचा दुसरा डाव १७८ धावात गुंडाळल्यानंतरही भारत ४२० धावांच्या विक्रमी लक्ष्याचा पाठलाग करताना चौथ्या दिवशी दुसऱ्या डावात १ बाद ३९ अशा अडचणीच्या स्थितीत आहे. सोमवारी खेळ थांबला त्यावेळी सलामीवीर शुभमन गिल (१५) आणि चेतेश्वर पुजारा (१२) खेळपट्टीवर होते. भारताला अखेरच्या दिवशी विजयासाठी ३८१ धावांची तर इंग्लंडला ९ बळींचा गरज आहे. भंगलेली खेळपट्टी बघता ९० षटकात एवढ्या धावा फटकाविणे कठीण आहे. त्यामुळे सामना अनिर्णीत राखण्यात यश आले तरी यजमान संघासाठी चांगला निकाल ठरेल. अश्विनच्या (६-६१) नेतृत्वाखाली भारतीय गोलंदाजांनी नियमित अंतरात बळी घेतले. त्यामुळे इंग्लंडचा दुसरा डाव ४६.३ षटकात संपुष्टात आला. इंग्लंडने बचावात्मक रणनीती कायम राखली आणि कर्णधार ज्यो रुटच्या (३२ चेंडूत ४० धावा) खेळीमुळे पाहुण्यांना भारतापुढे विक्रमी लक्ष्य ठेवता आले.

भारतामध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना सर्वात मोठा विजय यजमान संघाच्या नावावर आहे. त्यात इंग्लंडला २००८ मध्ये याच एमए चिदंबरम स्टेडियममध्ये ४ बाद ३८७ धावा करीत पराभूत केले होते.

कसोटी क्रिकेटमध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना सर्वात मोठ्या विजयाचा विक्रम वेस्ट इंडिजच्या नावावर आहे. त्यांनी मे २००३ मध्ये सेंट जोन्समध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ७ बाद ४१८ धावा करीत विजय नोंदविला होता. इंग्लंडच्या पहिल्या डावातील ५७८ धावसंख्येच्या प्रत्युत्तरात भारताचा पहिला डाव ३३७ धावात संपुष्टात आला. पण रुटने २४१ धावाची आघाडी घेतल्यानंतरही फॉलोऑन न देण्याचा निर्णय घेतला. भारतातर्फे वॉशिंग्टन सुंदर ८५ धावा काढून नाबाद राहिला तर, ऋषभ पंतने ९१ तर चेतेश्वर पुजाराने ७३ धावांचे उपयुक्त योगदान दिले. डॉम बेस इंग्लंडतर्फे सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ७७ धावात ४ बळी घेतले. जेम्स ॲन्डरसन (२-४६), जोफ्रा आर्चर (२-७५) व जॅक लीच (२-१०५) यांनीही प्रत्येकी दोन बळी घेतले. भारताच्या दुसऱ्या डावात गिल पुन्हा एकदा चांगल्या फॉर्मात दिसला. रोहित शर्माने जोफ्रा आर्चरच्या चेंडूंवर सलग चौकार व षटकार ठोकला, पण लीचच्या गोलंदाजीवर तो बोल्ड झाला.

अश्विनने मोडला ११४ वर्षांपूर्वीचा विक्रम
चेन्नई कसोटीच्या दुसऱ्या डावात पहिल्या चेंडूवर रोरी बर्न्सला बाद करीत भारताचा ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन याने ११४ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात डावाच्या पहिल्याच चेंडूवर एकाही फिरकी गोलंदाजाला बळी घेता आला नव्हता. यापूर्वी १८८८मध्ये इंग्लंडच्या बॉबी पील यांनी ऑस्ट्रेलियाच्या ॲलेक बेन्नेर्मनला बाद करून प्रथम हा पराक्रम केला होता. त्यानंतर १९०७ मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या अल्बर्ट व्होग्लर यानी इंग्लंडच्या टॉम हेयबर्ड यांना बाद केले. त्यानंतर तब्बल ११४ वर्षांनंतर अश्विनने हा मान मिळविला आहे.

ईशांत बनला ३०० बळी घेणारा तिसरा गोलंदाज
वेगवान गोलंदाज ईशांत शर्माने कसोटी सामन्यात ३०० विकेट घेण्याचा कारनामा केला. असा पराक्रम करणारा ईशांत तिसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. ईशांतने इंग्लंडचा फलंदाज लॉरेन्सला बाद करीत ३०० चा टप्पा गाठला. याआधी त्याच्या नावावर ९७ कसोटी सामन्यात २९७ बळींची नोंद होती. याआधी कपिल देव आणि झहीर खान या दिग्गजांनी कसोटी सामन्यात ३०० बळी घेतले आहेत. ३०० पेक्षा जास्त विकेट घेणारा ईशांत शर्मा सहावा भारतीय गोलंदाज ठरला आहे.

धावफलक
इंग्लंड पहिला डाव ५७८. भारत पहिला डाव :- रोहित शर्मा झे. बटलर गो. आर्चर ०६, शुभमन गिल झे. अँडरसन गो. आर्चर २९, चेतेश्वर पुजारा झे. बर्न्स गो. बेस ७३, विराट कोहली झे. पोप गो. बेस ११, अजिंक्य रहाणे झे. रुट गो. बेस ०१, ऋषभ पंत झे. लीच गो. बेस ९१, वॉशिंग्टन सुंदर नाबाद ८५, रविचंद्रन अश्विन झे. बटलर गो. लीच ३१, शाहबाज नदीम झे. स्टोक्स गो. लीच ००, ईशांत शर्मा झे. पोप गो. अँडरसन ०४, जसप्रीत बुमराह झे. स्टोक्स गो. अँडरसन ००. अवांतर (०६). एकूण ९५.५ षटकात सर्व बाद ३३७. बाद क्रम : १-१९, २-४४, ३-७१, ४-७३, ५-१९२, ६-२२५, ७-३०५, ८-३१२, ९-३२३, १०-३३७. 
गोलंदाजी : अँडरसन १६.५-५-४६-२, आर्चर २१-३-७५-२, स्टोक्स ६-१-१६-०, लीच २४-५-१०५-२, बेस २६-५-७६-४, रुट २-०-१४-०.
इंग्लंड दुसरा डाव :- रोरी बर्न्स झे. रहाणे गो. अश्विन ००, डॉम सिब्ले झे. पुजारा गो. अश्विन १६, डॅन लॉरेन्स पायचित गो. ईशांत १८, ज्यो रुट पायचित गो. बुमराह ४०, बेन स्टोक्स झे. पंत गो. अश्विन ०७, ओली पोप झे. रोहित गो. नदीम २८, जोस बटलर यष्टिचित पंत गो. नदीम २४, डॉम बेस पायचित गो. अश्विन २५, जोफ्रा आर्चर त्रि.गो. अश्विन ०५, जॅक लीच नाबाद ०८, जेम्स अँडरसन झे. व गो. अश्विन ००. अवांतर (७). एकूण ४६.३ षटकात सर्व बाद १७८. बाद क्रम : १-०, २-३२, ३-५८, ४-७१, ५-१०१, ६-१३०, ७-१६५, ८-१६७, ९-१७८, १०-१७८. गोलंदाजी : अश्विन १७.३-२-६१-६, नदीम १५-२-६६-२, ईशांत ७-१-२४-१, बुमराह ६-०-२६-१, वॉशिंग्टन १-०-१-०.
भारत दुसरा डाव :- रोहित शर्मा त्रि.गो. लीच १२, शुभमन गिल खेळत आहे १५, चेतेश्वर पुजारा खेळत आहे १२. एकूण १३ षटकात १ बाद ३९. बाद क्रम : १-२५. गोलंदाजी : आर्चर ३-२-१३-०, लीच ६-१-१३-०, अँडरसन २-१-२-०, बेस २-०-३-०.

Web Title: India vs England 1st Test India needs 381 on final day England removes Rohit for 12

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.