Join us  

India vs Australia : माझं अन् सचिनचं स्वप्न 'विराट'सेनाच पूर्ण करणार, सेहवागला विश्वास

India vs Australia : ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघाची कामगिरी काही अपवाद वगळता तितकी चांगली झालेली नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 4:26 PM

Open in App
ठळक मुद्देऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघाला तितकी चांगली कामगिरी करता आलेली नाही21 नोव्हेंबरपासून ट्वेंटी-20 सामन्याने या दौऱ्याला सुरुवात होणारविराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पराक्रम गाजवेल असा विश्वास

मुंबई : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेला 21 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघाची कामगिरी काही अपवाद वगळता तितकी चांगली झालेली नाही. पण, विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पराक्रम गाजवेल, असा विश्वास माजी कसोटीपटू वीरेंद्र सेहवागने व्यक्त केला आहे. मी, सचिन तेंडुलकर आणि व्हीव्हीएस लक्ष्मण, आम्ही तिघांनी पाहिलेलं स्वप्न 'विराट'सेना पूर्ण करेल, असा विश्वासही सेहवागने व्यक्त केला आहे.

तो म्हणाला,''ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत पराभवाची चव चाखवण्याचे स्वप्न मी, सचिन तेंडुलकर आणि व्हीव्हीएस लक्ष्मण आम्ही पाहिले होते. ते अद्याप पूर्ण झालेले नाही, परंतु विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा हा संघ ते पूर्ण करेल. या संघात युवा खेळाडूंचा भरणा आहे. फलंदाजी, जलद गोलंदाजी व फिरकी गोलंदाजी या सर्व आघाड्यांवर हा संघ सरस आहे.'' 

स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या गैरहजेरीत भारतीय संघाला कांगारूंना नमवण्याची चांगली संधी असल्याचे सेहवागने सांगितले. ''ऑस्ट्रेलियात विजय मिळवण्याची याहून चांगली संधी मिळणार नाही. यानंतर चार वर्षांनंतर भारत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर येईल आणि त्यावेळी संघात कोण असेल, कोण नसेल हे कोणीच सांगू शकत नाही. सध्याच्या घडीला ऑस्ट्रेलियाचा संघ तितका आव्हानात्मक नाही. स्मिथ व वॉर्नरच्या नसण्याने भारताच्या विजयाची शक्या वाढली आहे,'' असे सेहवागने सांगितले.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाविरेंद्र सेहवागविराट कोहलीसचिन तेंडुलकर