Join us  

IND vs AUS : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर विराट कोहली करू शकतो दोन पराक्रम, जाणून घ्या

India vs Australia : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि विक्रम हे घट्ट समिकरण बनलेलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 10:10 AM

Open in App
ठळक मुद्देभारतीय संघाचा कर्णधार  विराट कोहली आणि विक्रम हे घट्ट समिकरण बनलं आहेऑस्ट्रेलिया दौऱ्यावरही त्याला दोन अविश्वसनीय विक्रम करण्याची संधी आहेभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात आज पहिला ट्वेंटी-20 सामना

ब्रिस्बेन, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि विक्रम हे घट्ट समिकरण बनलेलं आहे. कोहलीने एखादी खेळी केली अन् विक्रम झाला नाही तर नवल. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघाला अपयश आले असले तरी कोहलीची बॅट चांगलीच तळपली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही चाहत्यांना कोहलीकडून दमदार फटकेबाजीची अपेक्षा आहे. भारतीय संघ या दौऱ्यात तीन ट्वेंटी-20, चार कसोटी आणि तीन वन डे सामने खेळणार आहे. या दौऱ्यावर कोहली कोणते विक्रम करतो हे मालिका संपल्यानंतर कळेलच, परंतु त्याला दोन मोठे पराक्रम करण्याची संधी आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला ट्वेंटी-20 सामना आज ब्रिस्बेन येथे होणार आहे. या दौऱ्यात कोहली सर्वात जलद 19000 आंतरराष्ट्रीय धावा करणारा फलंदाज बनू शकतो. त्याने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात खोऱ्याने धावा केल्या आहेत. याची प्रचिती आफ्रिका व इंग्लंड दौऱ्यावर आली. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 19000 धावा करण्यासाठी 335 धावांची गरज आहे. त्याने हा पल्ला सर केला, तर सर्वात जलद 19000 धावा करण्याची विक्रम त्याच्या नावावर नोंदवला जाईल. अशी कामगिरी करणारा तो सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांच्यानंतरचा तिसरा भारतीय, तर एकंदर 12 वा फलंदाज ठरणार आहे.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे मालिकेत कोहलीने सर्वात जलद वन डेतील 10000 धावांचा विक्रम केला होता. त्याने तेंडुलकरचा विक्रम मोडला होता. याशिवाय कोहलीच्या नावावर सर्वात जलद 15000, 16000, 17000 आणि 18000 आंतरराष्ट्रीय धावांचा विक्रम आहे. कोहलीला आणखी एक विक्रम खुणावत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध ट्वेंटी-20 सामन्यांत 500 धावा करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरण्याची संधी आहे. त्यासाठी कोहलीला तीन सामन्यांच्या मालिकेत 77 धावा कराव्या लागतील. 2016च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारताने ट्वेंटी-20 मालिका 3-0 अशा फरकाने जिंकली होती. त्या मालिकेत कोहलीने तीन अर्धशतके झळकावली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्ध ट्वेंटी-20मध्ये कोहलीने 11 सामन्यांत 423 धावा केल्या आहेत. 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाविराट कोहलीबीसीसीआय