India Vs Australia Test: सिडनीत ऐतिहासिक विजयाची तयारी; अजिंक्य रहाणेची लागणार 'कसोटी'

India Vs Australia Third Test: तिसरी कसोटी आजपासून : रोहितच्या पुनरागमनामुळे भारताचे ऑस्ट्रेलियाविरुद्ध पारडे जड

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2021 04:50 AM2021-01-07T04:50:41+5:302021-01-07T04:51:40+5:30

whatsapp join usJoin us
India Vs Australia Test: Preparing for a historic victory in Sydney | India Vs Australia Test: सिडनीत ऐतिहासिक विजयाची तयारी; अजिंक्य रहाणेची लागणार 'कसोटी'

India Vs Australia Test: सिडनीत ऐतिहासिक विजयाची तयारी; अजिंक्य रहाणेची लागणार 'कसोटी'

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

सिडनी : सुरुवातीला दारुण पराभवाचा धक्का पचविणारा भारतीय संघ पुढच्या दहा दिवसात चवताळून उभा राहिला. दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला लोळवून विजयी पथावर स्वार झाल्यानंतर ‘बिग हिटर’ रोहित शर्माचेदेखील पुनरागमन झाले. आता आज गुरुवारपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटीत यजमान संघाला लोळवून चार सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी ऐतिहासिक आघाडी मिळविण्याची संधी चालून आली आहे. असे झाल्यास भारतीय संघाला बॉर्डर-गावसकर ट्रॉफीवर अधिकार कायम राखता येणार आहे. सिडनी मैदानावर भारतीय फलंदाजांनी काही ऐतिहासिक खेळी केल्या पण विजयाच्या बाबतीत हे मैदान ‘लकी’ ठरलेले नाही. 


४२ वर्षांपूर्वी एससीजीवर भारत विजयी झाला होता. त्यानंतर सहा सामन्यात पराभवाचे तोंड पाहावे लागले. कर्णधार विराट कोहली आणि दोन प्रमुख गोलंदाजांशिवाय नेतृत्व सांभाळणाऱ्या अजिंक्य रहाणेला येथे यश आल्यास हा अविस्मरणीय क्षण ठरणार आहे.


मोहम्मद शमी आणि उमेश यादव नसताना भारतीय गोलंदाजांनी यजमान फलंदाजांमध्ये दहशत निर्माण केली आहे. त्याचा परिणाम म्हणावा की काय, ७० टक्के फिट असलेल्या डेव्हिड वॉर्नरला खेळविण्याची ऑस्ट्रेलियाने तयारी केली. ‘वॉर्नर अन्य सहकाऱ्यांमध्ये ऊर्जा निर्माण करेल,’ या शब्दात कर्णधार टिम पेन याला वॉर्नरला खेळविण्याचे समर्थन करावे लागले. आयपीएलदरम्यान जखमी झाल्याने झटपट क्रिकेटला मुकलेला रोहित शर्मा दोन कसोटीनंतर संघात परतला. तो दोन आठवडे विलगीकरणातही होता. नंतर एका हाॅटेलमध्ये जेवणासाठी गेला म्हणून जैव सुरक्षा नियमांचा भंग झाला का, याची चौकशी सुरू झाली. रोहितवर मात्र अशा गोष्टींचा परिणाम होणार नाही. तो किती व्यावसायिक आहे, याचा पुरावा सामना सुरू झाल्यानंतर त्याच्या खेळीद्वारे मिळू शकेल. त्याची उपस्थिती युवा खेळाडूंना आणि संघाला प्रोत्साहन देणारी ठरेल.


 रोहित आणि शुभमान गिल यांनी चांगली सुरुवात केल्यास पहिल्या दोन्ही सामन्यात अपयशी ठरल्याने दडपणात असलेल्या पुजाराला दिलासा मिळणार आहे. रहाणेने मागच्या सामन्यात शतक ठोकले शिवाय विजय मिळवून दिल्याने आत्मविश्वासाने तो खेळेल यात शंका नाही. लोकेश राहुल जखमी झाल्यामुळे मधल्या फळीत हनुमा विहारीला संधी मिळाली. वेगवान गोलंदाज नवदीप सैनी पदार्पण करणार आहे.


फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने दहा गडी बाद केले असून स्मिथ आणि लाबुशेन यांच्यासारख्या फलंदाजांनी त्याचा धसका घेतला आहे. ट्रॅव्हिस हेड याच्याकडून सीए व्यवस्थापनाला चांगल्या खेळीची अपेक्षा असेल. जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखालील वेगवान माऱ्याने मागच्या सामन्यात यजमानांना चांगलेच पाणी पाजले होते. बुमराह, नवदीप आणि मोहम्मद सिराज या सामन्यातही प्रतिस्पर्धी फलंदाजांना घाम फोडतील, असे चित्र आहे.

उभय संघ असे

भारत  

रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (कर्णधार), हनुमा विहारी, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, 
नवदीप सैनी.

ऑस्ट्रेलिया
डेव्हिड वाॅर्नर, मॅथ्यू वेड, 
विल पुकोवस्की, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमरुन ग्रीन, टिम पेन (कर्णधार आणि यष्टिरक्षक), नाथन लियोन, पॅट कमिन्स, मिशेल स्टार्क, जोश हेजलवूड, मार्कस हॅरिस, मिशेल स्वेपसन, 
मायकेल नेसर.

पीच रिपोर्ट...
खेळपट्टीवर पुरेसे गवत आहे. बदलते हवामान लक्षात घेऊन टणक खेळपट्टीची निर्मिती करण्यात आली आहे. हवामानामुळे खेळपट्टीचे स्वरूप बदलावे लागते. गवत असल्याचा लाभ दोन्ही संघांना होईल.’
- ॲडम लेव्हिस, क्यूरेटर


वेदर रिपोर्ट...
तापमान ३० अंश सेल्सिअसच्या जवळपास राहण्याची शक्यता आहे. यंदा प्रचंड उकाडा आणि पावसामुळे खेळपट्टी बरेचदा झाकून ठेवण्यात आली होती. उष्ण वारे वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मागच्यावर्षी येथे ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा २७९ धावांनी पराभव केला होता. 
 

Web Title: India Vs Australia Test: Preparing for a historic victory in Sydney

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.