Join us  

India vs Australia : ..तरीही भारताचे पारडे जड, ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरी लढत आज

India vs Australia Update : कॅनबेरामध्ये तिसरा वन-डे व पहिला टी-२० सामना जिंकल्यानंतर भारतीय संघ आता सिडनी मैदानावर परतला आहे. येथे ऑस्ट्रेलियाने पहिले दोन वन-डे जिंकत मालिका विजय साकारला होता. 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2020 2:56 AM

Open in App

सिडनी : पहिल्या लढतीत शानदार विजय मिळविल्यानंतर अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या अनुपस्थितीनंतरही रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताचे पारडे वरचढ राहील. कारण विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघ मालिका जिंकण्यासाठी उत्सुक आहे. कसोटी मालिकेपूर्वी टी-२० मालिका जिंकल्यामुळे भारतीय संघाचे मनोधैर्य उंचावण्यास मदत मिळेल. कॅनबेरामध्ये तिसरा वन-डे व पहिला टी-२० सामना जिंकल्यानंतर भारतीय संघ आता सिडनी मैदानावर परतला आहे. येथे ऑस्ट्रेलियाने पहिले दोन वन-डे जिंकत मालिका विजय साकारला होता. पहिल्या टी-२० मध्ये जडेजाच्या डोक्याला दुखापत झाल्यानंतर  ‌‘कनकशन’ पर्याय म्हणून आलेल्या युजवेंद्र चहलने शानदार गोलंदाजी करताना तीन बळी घेतले होते. भारताला तळाच्या फळीत जडेजाच्या आक्रमक फलंदाजीची उणीव भासेल, पण विजयामुळे भारताचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. जडेजाने २३ चेंडूंमध्ये नाबाद ४४ धावा करीत भारताला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली होती. कोहलीला मात्र आघाडीच्या पाच फलंदाजांनीच चांगली कामगिरी करीत तळाच्या फळीची गरज भासू देऊ नये, असे वाटत असेल.  ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नर फिट नाही आणि ॲरोन फिंचही पूर्णपणे फिट होऊ नये, असे भारतीय संघाला वाटत असेल. डार्सी शॉर्ट पहिल्या टी-२० मध्ये सहज भासला नाही आणि चहलने त्याच्या उणिवा शोधत ऑफ स्टम्पच्या बाहेर मारा केला होता. स्टीव्ह स्मिथ कसोटी व वन-डेमध्ये महान फलंदाज आहे, टी-२० मध्ये मात्र त्याला त्या कामगिरीची पुनरावृत्ती करता येत नाही. ग्लेन मॅक्सवेलच्या उणिवा शेवटच्या वन-डे व पहिल्या टी-२० मध्ये बुमराह व टी. नटराजन यांनी चव्हाट्यावर आणल्या.  भारताला आघाडीच्या फळीकडून चांगल्या कामगिरीची आशा असेल.  मनीष पांडेला संधी मिळते किंवा नाही, याबाबत उत्सुकता आहे.उभय संघ  यातून निवडणारभारत :-  विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मयांक अग्रवाल, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन, वाशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चाहर, टी. नटराजन, शार्दुल ठाकूर.ऑस्ट्रेलिया :- ॲरोन फिंच (कर्णधार), सीन एबोट, एश्टोन एगर, एलेक्स कारे, कॅमरन ग्रीन, जोश हेजलवुड, मोइजेस हेनरिक्स, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, डॅनियल सॅम्स, केन रिचर्डसन, स्टीव्हन स्मिथ, मिशेल स्टार्क, मार्कस स्टोइनिस, मॅथ्यू वेड, डार्सी शॉर्ट, एडम झम्पा. सामना दुपारी १.४० पासूनभारतीय वेळेनुसार

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाआंतरराष्ट्रीय क्रिकेट