ठळक मुद्देसराव सामन्यात मुरली विजयला सूर गवसलाक्रिकेट ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सराव सामना अनिर्णीतभारताच्या दुसऱ्या डावात 2 बाद 211 धावा
सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : पृथ्वी शॉच्या दुखापतीमुळे सलामीला संधी मिळालेल्या मुरली विजयने सराव सामन्यात खणखणीत शतक झळकावले. क्रिकेट ऑस्ट्रेलिया एकादश संघाविरुद्धच्या सराव सामन्याच्या अखेरच्या दिवशी विजयने 129 धावांची खेळी केली. लोकेश राहुलनेही 62 धावा करताना सूर सापडल्याचा दिलासा दिला. भारताने हा सामना अनिर्णीत राखण्यात यश मिळवले. भारताने दुसऱ्या डावात 2 बाद 211 धावा करून सामना अनिर्णीत सोडवला.
विजयने 132 चेंडूंत 129 धावा केल्या. त्यात 16 चौकार आणि पाच षटकारांचा समावेश होता. पहिल्या डावात अवघ्या तीन धावांवर माघारी परतलेला
लोकेश राहुलला दुसऱ्या डावात अर्धशतक करण्यात यशस्वी झाला. त्याने 98 चेंडूंत 62 धावा केल्या. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 544 धावांचा डोंगर उभा केला आणि 186 धावांची आघाडी घेतली. भारताने दुसऱ्या डावात 2 बाद 211 धावा करून सामना अनिर्णीत सोडवला. कर्णधार विराट कोहलीने तिसऱ्या स्थानावर हनुमा विहारीला फलंदाजीला पाठवले. त्याने नाबाद 15 धावा केल्या.
तत्पूर्वी, हॅरी निएलसेनने 100 धावा केल्या आणि डी अॅर्सी शॉर्ट, मॅक्स ब्रियंट आणि अॅरोन हार्डी यांनी अर्धशतकी खेळी करत संघाला 544 धावांपर्यंत मजल मारून दिली. मोहम्मद शमीने सर्वाधिक ( 3/97) तीन विकेट घेतल्या. त्याला आर अश्विनने दोन विकेट्स घेत चांगली साथ दिली. इशांत शर्मा, उमेश यादव आणि कोहली यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.