Join us  

India vs Australia : भारताचा ऑस्ट्रेलियावर मालिका विजय, हार्दिक पांड्या, शिखर धवनची कामगिरी निर्णायक

India vs Australia Update : दुसऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ६ गडी राखून पराभव करीत मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2020 4:57 AM

Open in App

सिडनी : शिखर धवनच्या खेळीनंतर हार्दिक पांड्या याच्या आक्रमक खेळीच्या जोरावर भारताने रविवारी येथे दुसऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ६ गडी राखून पराभव करीत मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. या विजयाबरोबरच भारताने यजमानांकडून वन-डे मालिकेत १-२ फरकाने झालेल्या पराभवाचा हिशेब चुकता केला. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेले १९५ धावांचे आव्हान भारताने १९.४ षटकांत पूर्ण केले.भारतीय संघाने शुक्रवारी कॅनबेरा येथे पहिल्या टी-२० सामन्यात ११ धावांनी विजय मिळविला होता. भारताला विजयासाठी अखेरच्या २ षटकात २५ धावांची गरज होती. त्यात १८ व्या षटकात भारताने १२ धावा वसूल केल्या. यात पांड्याने २ चौकार मारले. २२ चेंडूत नाबाद ४२ धावा करणारा हार्दिक पांड्या सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. भारताला अखेरच्या षटकात १४ धावांची गरज असताना पांड्याने २ षटकारांसह १४ धावा वसूल करीत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला पहिल्या दोन षटकात एकही चौकार मारता आला नाही. मात्र, त्यानंतर धवन (५२) आणि लोकेश राहुल (३०) यांनी चौकार व षटकारांचा पाऊस पाडला. राहुलने फ्री हिटवर अँड्र्यू टाय याला कव्हरला चौकार मारत तर, धवनने ग्लेन मॅक्सवेल याला दोन चौकार व एक षटकार ठोकत आक्रमक पवित्रा अवलंबला.तथापि, ऑस्ट्रेलियाने राहुलला बाद करीत भारताला पहिला धक्का दिला. राहुल मिशेल स्वेपसन याला डीप पॉईंटवर सोपा झेल देऊन तंबूत परतला. तथापि, या दोघांच्या फलंदाजीमुळे भारताने पॉवरप्लेमध्ये १ बाद ६० धावा करीत चांगली सुरुवात केली. ॲडम जम्पा याने धवनला बाद करीत ऑस्ट्रेलियाला दुसरे यश मिळवून दिले. स्वेपसन १० चेंडूत १५ धावा करीत धावबाद झाला. सॅम्सने विराट कोहलीच्या रूपाने ऑस्ट्रेलियाला मोठे यश मिळवून दिले. विराटने २४ चेंडूंत ४० धावा केल्या.  तत्पूर्वी, जखमी  फिंचच्या अनुपस्थितीत कर्णधारपद भूषविणाऱ्या मॅथ्यू वेड याच्या सुरेख अर्धशतकी खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने ५ बाद १९४ धावा केल्या. वेड याने ३२ चेंडूत ५८, तर स्टीव्ह स्मिथने ४६ धावांचे योगदान दिले.  भारताकडून टी. नटराजन याने ४ षटकात २० धावा देऊन २ गडी बाद केले. 

ऑस्ट्रेलियात सर्वाधिक लक्ष्याचा यशस्वी पाठलाग१९८ भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया २०१६१९५ भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया २०२०१७४ श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया २०१७१६९ श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया २०१७ 

 चहलने साधली बुमराहची बरोबरीसिडनी : भारताकडून टी २० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेण्याच्या जसप्रीत बुमराह याच्या ५९ बळींच्या विक्रमाची रविवारी फिरकी गोलंदाज यजुवेंद्र चहलने बरोबरी साधली. चहलने ऑस्ट्रेलियाविरुद्ध रविवारी झालेल्या सामन्यात स्टीव्ह स्मिथचा बळी घेत ही बरोबरी साधली. जसप्रीत बुमराह याने ५० सामन्यात तर चहलने ४४ सामन्यात ५९ बळी घेतले. त्याचप्रमाणे तीन वेळा ५० पेक्षा जास्त धावा देणारा युजवेंद्र चहल हा टी २० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे.  

क्रिकेट सामना आणि भारतीय चाहतेसिडनी : जगात टीम इंडियाची लढत कुठेही असेल आणि भारतीय चाहते स्टेडियममध्ये दिसणार नाही, असे दृश्य विरळच. सामना मग दक्षिण आफ्रिकेत असो, ऑस्ट्रेलिया असो किंवा इंग्लंडमध्ये असो स्टेडियममध्ये भारतीय चाहत्यांची गर्दी झालेली दिसते. यजमान देशांच्या चाहत्यांच्या तुलनेत भारतीय चाहत्यांची संख्याच अधिक असल्यामुळे सामना भारतात तर खेळल्या जात नाही ना, असा भास होतो. कोरोना पर्वात रविवारी सिडनी मैदानावर खेळल्या गेलेल्या लढतीदरम्यान भारतीय चाहत्यांची संख्या लक्षणीय होती. यावेळी चाहत्यांनी संघांचा उत्साह वाढविला आणि टीम इंडियानेही मालिकेत विजयी आघाडी घेत चाहत्यांना निराश केले नाही.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाहार्दिक पांड्याशिखर धवनविराट कोहली