ठळक मुद्देअॅडलेड डे-नाईट कसोटीत तिसऱ्या दिवशी टीम इंडियाचा पराभवटीम इंडियाचा दुसरा डाव ३६ धावांवर गडगडला, ऑसींनी ९० धावांचे लक्ष्य सहज पार केले२६ डिसेंबरपासून दुसऱ्या कसोटीला सुरुवात, विराट कोहली मायदेशी परतणार
India vs Australia : पहिल्या डावात ५३ धावांची आघाडी घेऊन फ्रंट सीटवर बसलेल्या टीम इंडियाला एका तासात ऑसी गोलंदाजांनी थेट उचलून मागच्या बाकावर फेकले. भारताचा दुसरा डाव तिसऱ्या दिवशी तासात गडगडला. टीम इंडियाचा दुसरा डाव ३६ धावांत गुंडाळून ऑस्ट्रेलियानं ९० धावांचे लक्ष्य ८ विकेट्स राखून पार केले. ऑस्ट्रेलियानं मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाच्या या निराशाजनक कामगिरीवर पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी ( Shahid Afridi) यानं त्याचं मत मांडलं.
तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड यांनी टीम इंडियाच्या फलंदाजांना झटपट गुंडाळले. मयांक अग्रवाल वगळता भारताचा एकही फलंदाज ५० मिनिटांपेक्षा अधिक काळ खेळपट्टीवर टिकला नाही. अजिंक्य रहाणे फक्त ४ मिनिटांत तंबूत परतला. पृथ्वी शॉ ( १५ मिनिटे), चेतेश्वर पुजारा ( १७), विराट कोहली ( १८), हनुमा विहारी ( ४४) आणि वृद्धीमान सहा ( २७) यांनाही ऑसी गोलंदाजांनी फार काळ खेळपट्टीवर जम बसवू दिला नाही. भारताच्या एकाही फलंदाजाला दुहेरी आकडाही करता आला नाही. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच भारतीय संघावर ही नामुष्की आली.
या कामगिरीनंतर त्यांच्यावर टीका होत असताना आफ्रिदी टीम इंडियाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आणि भारतीय संघ कमबॅक करेल असे मत मांडले. पण, विराट कोहलीच्या अनुपस्थितीत त्यांच्यासमोरील आव्हान अधिक वाढले आहे, असेही तो म्हणाला. आफ्रिदी म्हणाला,''कमिन्स आणि हेझलवूड यांनी अप्रतिम गोलंदाजी केली. कसोटी क्रिकेटमध्ये बऱ्याच वर्षांनंतर जलदगती गोलंदाजांची टॉप क्लास कामगिरी पाहायला मिळाली. भारतीय फलंदाजांच्या फळीत अजूनही कमबॅक करण्याची क्षमता आहे, परंतु विराट कोहलीच्या अनुपस्थितीत ते अजून आव्हानात्मक बनले आहे.''
दरम्यान, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाला मोठा झटका लागला आहे. अॅडलेड टेस्ट मॅचच्या तिसऱ्या दिवशी फलंदाजी करताना मोहम्मद शमीला दुखापत झाली होती. रिटायर्ड हर्ट होत तो माघारी परतला. तो मैदानावर परत आलाच नाही. आता त्याच्या डाव्या हाताला फ्रॅक्चर असल्याचे समोर आले आहे. यामुळे तो टेस्ट सिरीजमधून बाहेर पडला आहे. २२व्या षटकात मोहम्मद शमी रिटायर्ड हर्ट झाल्यानं भारताचा डाव ९ बाद ३६ धावांवर संपुष्टात आला. मोहम्मद शमी क्षेत्ररक्षणासाठीदेखील मैदानावर आला नव्हता.