Join us  

India vs Australia, 3rd ODI : टीम इंडियाला विजय मिळवण्यात यश; हार्दिक पांड्या-रवींद्र जडेजा यांनी लाज वाचवली

India vs Australia, 3rd ODI :  भारतीय संघानं तिसऱ्या वन डे सामन्यात विजय मिळवून इभ्रत वाचवली.

By स्वदेश घाणेकर | Published: December 02, 2020 5:00 PM

Open in App
ठळक मुद्देहार्दिक पांड्या-रवींद्र जडेजा यांची नाबाद १५० धावांची भागीदारी५ बाद १५२ वरून टीम इंडियाची ३०२ धावांपर्यंत मजलशार्दूल ठाकूर, टी नटराजन आणि जसप्रीत बुमराह यांनी दिले धक्के

India vs Australia, 3rd ODI :  भारतीय संघानं तिसऱ्या वन डे सामन्यात विजय मिळवून इभ्रत वाचवली. हार्दिक पांड्यारवींद्र जडेजा यांनी १५० धावांची नाबाद भागीदारी करताना संघाला ३०२ धावांचा डोंगर उभा करून दिला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंच आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी दमदार खेळ करताना टीम इंडियाचे टेंशन वाढवले होते. पण, जसप्रीत बुमराहनं मोक्याच्या क्षणी मॅक्सवेलचा त्रिफळा उडवला आणि सामन्याला कलाटणी दिली. पराभवानंतरही ऑस्ट्रेलियानं ही मालिका २-१ अशी जिंकली. 

टीम इंडियाच्या आघाडीच्या फलंदाजांनी पुन्हा अपयशाचा पाढा वाचला. पण, विराट कोहली, हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा यांनी दमदार खेळताना टीम इंडियाला मोठा पल्ला गाठून दिला. ५ बाद १५२ अशा अवस्थेत असलेल्या टीम इंडियासाठी पांड्या-जडेजा जोडी धावून आली. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी नाबाद १५० धावांची विक्रमी भागीदारी केली. विराट ७८ चेंडूंत ५ चौकारासह ६३ धावांवर माघारी परतला. 

हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा यांनी सहाव्या विकेटसाठी १५० धावांची भागीदारी करताना संघाला समाधानकारक पल्ला गाठून दिला. हार्दिकनं मालिकेतील सलग दुसरे आणि कारकिर्दीतील ६वे अर्धशतक पूर्ण केले. जडेजानेही १३वे अर्धशतक पूर्ण करून हार्दिकला तोडीसतोड साथ दिली. या दोघांच्या फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियानं ५ बाद ३०२ धावा केल्या. हार्दिक ७६ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारासह ९२ धावांवर, तर रवींद्र ५० चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ६६ धावांवर नाबाद राहिला.  

डेव्हिड वॉर्नरची अनुपस्थिती ऑस्ट्रेलियाला जाणवली. मार्नस लाबुशेनला कर्णधार अॅरोन फिंचला सलामीला साजेशी साथ देता आली नाही. टीम इंडियाकडून पहिलाच सामना खेळणाऱ्या टी नटराजननं ऑसींना पहिला धक्का दिला. लाबुशेन ७ धावांवर त्रिफळाचीत झाला. स्टीव्ह स्मिथ ( ७) शार्दूल ठाकूरचा शिकार बनला. ठाकूरनं मॉईजेस हेन्रीक्स (२२) बाद करून ऑसींना आणखी एक धक्का दिला. पदार्पणवीर कॅमेरून ग्रीन ( २१) मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. ऑस्ट्रेलियाचाही निम्मा संघ १५८ धावांवर तंबूत परतला होता. अॅलेक्स केरी आणि ग्लेन मॅस्कवेल यांनी ताबडतोड अर्धशतकी भागीदारी करताना टीम इंडियाची चिंता वाढवली होती. पण, ३८व्या षटकात केरी ( ३८) धावबाद झाला.  मॅक्सवेलनं सातव्या विकेटसाठी अॅश्टन अॅगरसह अर्धशतकी भागीदारी करताना ऑस्ट्रेलियाच्या विजयाच्या आशा जीवंत राखल्या होत्या. मॅक्सवेलनं ३३ चेंडूंत वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केले. ४५व्या षटकात बुमराहनं टीम इंडियाला मोठं यश मिळवून दिलं. मॅक्सवेल ३८ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांच्या मदतीनं ५९ धावांवर तंबूत परतला. हा सामन्यातील टर्निंग पॉईंट ठरला.  अॅगर २८ धावांत माघारी परतला. नटराजननं पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात १०-१-७०-२ अशी कामगिरी केली. शार्दूल ठाकूर सर्वात यशस्वी ठरला. त्यानं १०-१-५१-३ अशी कामगिरी केली. भारतानं १३ धावांनी हा सामना जिंकला. ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ २८९ धावांत तंबूत परतला. 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाहार्दिक पांड्यारवींद्र जडेजाविराट कोहली