Join us  

India vs Australia, 4th Test Day 4 : भारतीय गोलंदाजांनी चोख कामगिरी बजावली, आता फलंदाजांची वेळ आली

India vs Australia, 4th Test: मोहम्मद सिराजनं ७३ धावांत ५ विकेट्स घेतल्या, तर शार्दूलनं ६१ धावांत ४ विकेट्स घेतल्या.

By स्वदेश घाणेकर | Published: January 18, 2021 11:53 AM

Open in App
ठळक मुद्देमोहम्मद सिराजनं ७३ धावांत ५ विकेट्स, तर शार्दूलनं ६१ धावांत ४ विकेट्स घेतल्याऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २९४ धावांवर गडगडला

India vs Australia, 4th Test Day 4 : ब्रिस्बेन कसोटीत चौथ्या डावात फलंदाजी करणं सोपं नाही, याची प्रचिती चौथ्या दिवसाचा खेळ पाहताना आली. अनपेक्षित उसळी घेणाऱ्या चेंडूंचा सामना करताना ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांचा कस लागला. तरीही त्यांनी टीम इंडियासमोर आव्हानात्मक लक्ष्य उभे करण्यात यश मिळवले. मोहम्मद सिराज ( Mohammed Siraj) आणि शार्दूल ठाकूर ( Shradul Thakur) यांनी मदत करणाऱ्या खेळपट्टीवर दबदबा गाजवताना ऑस्ट्रेलियाला धक्के दिले. 

चौथ्या दिवसाच्या सकाळच्या सत्रात टीम इंडियाच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला चार धक्के दिले. शार्दूल व वॉशिंग्टन यांनी सलामीवीरांना माघारी पाठवल्यानंतर मोहम्मद सिराजनं एकाच षटकात दोन फलंदाज बाद केले. २५व्या षटकात शार्दूलनं टीम इंडियाला पहिलं यश मिळवून दिलं. मार्कस हॅरीसला ( ३८) त्यानं बाद केलं.  पुढच्याच षटकात वॉशिंग्टननं डेव्हिड वॉर्नरला ( ४८) पायचीत केलं.  स्टीव्ह स्मिथ व मार्नस लाबुशेन आक्रमक खेळ करताना दिसले आणि अजिंक्य रहाणेनं त्यांना रोखण्यासाठी मोहम्मद सिराजला पुन्हा गोलंदाजीला बोलावले. अजिंक्यची ही चाल यशस्वी ठरली आणि सिराजनं एकाच षटकात लाबुशेन ( २५) व मॅथ्यू वेड ( ०) यांना माघारी पाठवले.   स्टीव्ह स्मिथनं आक्रमक खेळ करताना अर्धशतक पूर्ण केलं. तत्पूर्वी वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर सिराजनं स्मिथचा झेल सोडला. पण, याची भरपाई त्यानं केली. अप्रतिम चेंडू टाकून स्मिथला त्यानं माघारी जाण्यास भाग पाडले. अनपेक्षित उसळी घेणारा चेंडू स्मिथच्या अंगठ्याला लागला आणि अजिंक्यनं तो झेल टिपला. त्याला ५५ धावांवर माघारी जावे लागले. यानंतर शार्दूल ठाकूरनं ऑसींना धक्का दिला. कॅमेरून ग्रीन ( ३७) ठाकूरच्या गोलंदाजीवर रोहित शर्माच्या हाती झेल देऊन माघारी परतला. पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ काही काळ थांबला होता. त्यानंतर शार्दूल व सिराज यांनी ऑसींना धक्का देण्याचे सत्र कायम ठेवले. पॅट कमिन्स एकाबाजूनं फटकेबाजी करत ऑसींची आघाडी वाढवत होता आणि त्याची हीच खेळी सामन्यात निर्णयाक ठरल्यास आश्चर्य वाटायला नको.

मोहम्मद सिराजनं ७३ धावांत ५ विकेट्स घेतल्या, तर शार्दूलनं ६१ धावांत ४ विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २९४ धावांवर गडगडला आणि टीम इंडियाला आता विजयासाठी कराव्या लागतील ३२८ धावा. 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाशार्दुल ठाकूरवॉशिंग्टन सुंदरमोहम्मद सिराज