सिडनी: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत भारतीय खेळाडूंना प्रेक्षकांकडून वर्णद्वेषी शेरेबाजीचा सामना करावा लागला. त्याचा तपास करून अहवाल देण्याचे आदेश आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (आयसीसी) क्रिकेट ऑस्ट्रेलियाला दिले आहेत. यासोबतच चौकशीचा अहवालदेखील आयसीसीकडून मागवण्यात आला आहे. यानंतर आता ऑस्ट्रेलियन कर्णधार टिम पेनवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. पंचांच्या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त करणाऱ्या पेनच्या सामना शुल्कातून १५ टक्के रक्कम वजा करण्यात येणार आहे.
तिसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पंचांच्या एका निर्णयाबद्दल टिम पेननं तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यामुळे आयसीसीनं खेळाडूंसाठी आणि खेळाडूंशी संबंधित कर्मचाऱ्यांशी संबंधित कलम २.८ चं उल्लंघन झालं. याशिवाय त्याच्या शिस्तीशी संबंधित रेकॉर्डमध्ये एक डिमेरिट गुण जोडण्यात आला आहे. गेल्या २४ महिन्यांत पेनकडून झालेली ही पहिलीच चूक आहे.
सिडनी कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाचा पहिला डाव सुरू होता. ५६ व्या षटकात चेतेश्वर पुजारा फलंदाजी करत असताना टिम पेननं जोरदार अपील केलं. मात्र पंचांनी पुजारा नाबाद असल्याचा निर्णय दिला. त्याबद्दल पेननं नाराजी व्यक्त केली. पेननं डीआरएस घेतला. मात्र त्यातही पुजाराला नाबाद देण्यात आलं. त्यानंतर पुजारानं पंचाशी वाद घातला. त्याबद्दल पेनवर दंडात्मक कारवाई झाली. पेननं आपली चूक मान्य केली आहे.