India vs Australia, 3rd Test, Day 2 : तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दोन सत्रात टीम इंडियाचे वर्चस्व राहिले. २ बाद १६६ धावांवरून दुसऱ्या दिवसाची सुरुवात करणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा डाव ३३८ धावांवर गडगडला. रवींद्र जडेजानं ( Ravindra Jadeja) सुरेख गोलंदाजी करताना टीम इंडियासाठी महत्त्वाच्या विकेट्स टिपल्या. स्टीव्हन स्मिथचे ( Steve Smith) शतक हीच ऑस्ट्रेलियासाठी आजच्या दिवसाची सकारात्मक बाब म्हणावी लागेल. जडेजानं ६२ धावांत ४ विकेट्स घेतल्या. बुमराह व नवदीप सैनी यांनी प्रत्येकी दो विकेट्स घेतल्या.
पुकोव्हस्कीनं ११० चेंडूंत ४ चौकारांच्या मदतीनं ६२ धावा केल्या. त्यानं लाबुशेनसह तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रातही पावसाचा खेळ झाला. त्यानंतर लाबुशेन व स्मिथ या जोडीनंही शतकी भागीदारी केली. लाबुशेन शतकाच्या उंबरठ्यावर होता आणि अजिंक्यन जडेजाला पाचारण केलं. जडेजाच्या फिरकीवर लाबुशेन फसला आणि अजिंक्यनं स्लिपमध्ये शार्प कॅच टिपला. लाबुशेन १९६ चेंडूंत ११ चौकारांसह ९१ धावांवर माघारी परतला.
पहिल्या दोन सामन्यांत सलामीला खेळणारा मॅथ्यू वेड पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. जडेजानं त्यालाही जाळ्यात अडकवलं आणि जसप्रीत बुमराह करवी झेलबाद करून माघारी पाठवलं. त्यानंतर बुमराहनं कॅमेरून ग्रीनला भोपळ्यावर बाद केले. बुमराहनं ऑसी कर्णधार टीम पेनचा ( १) त्रिफळा उडवला. पण, आत्मविश्वास उंचावलेल्या स्मिथनं खिंड लढवली. त्यानं २७ वे कसोटी शतक पूर्ण केले. घऱच्या मैदानावरील त्याचे हे १४ वे शतक असून २०१७ नंतरचे पहिलेच.. डिसेंबर २०१७मध्ये त्यानं इंग्लंडविरुद्ध बॉक्सिंग डे कसोटीत घरच्या मैदानावर अखेरचे शतक झळकावले होते.
तळाच्या फलंदाजांना फार योगदान देता आले नाही. जडेजानं ऑस्ट्रेलियाचे चार फलंदाज माघारी पाठवले. स्मिथला १३१ धावांवर जडेजानं धावबाद केले. ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ ३३८ धावांवर तंबूत परतला.