Join us  

India vs Australia 3rd Test: भारतीय खेळाडूंवरील वर्णद्वेषी शेरेबाजीची ICCकडून दखल; अहवाल मागवला

India vs Australia 3rd Test: आयसीसीनं क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडे मागितला कारवाईचा अहवाल

By कुणाल गवाणकर | Published: January 10, 2021 5:53 PM

Open in App

सिडनी: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनीत सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंना वर्णद्वेषी शेरेबाजीचा सामना करावा लागला. या घटनेच्या चौकशीचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. याशिवाय क्रिकेट ऑस्ट्रेलियादेखील घटनेचा समांतर तपास करणार आहे. भारतीय खेळाडूंना प्रेक्षकांनी दिलेल्या वागणुकीबद्दल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (आयसीसी) नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणाच्या कारवाईचा अहवाल आयसीसीनं मागवला आहे.

आज (रविवारी) तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असलेल्या मोहम्मद सिराजबद्दल प्रेक्षकांनी अपशब्द वापरले. त्यानंतर भारतीय संघाचे खेळाडू एकत्र आले आणि त्यांनी याची तक्रार पंचांकडे केली. त्यानंतर याची माहिती सुरक्षा रक्षकांना देण्यात आली. सुरक्षा रक्षकांनी अपशब्द वापरणाऱ्या प्रेक्षकांच्या गटाला शोधलं आणि त्यांना स्टँडमधून बाहेरचा रस्ता दाखवला.या घटनेबद्दल ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डानं माफी मागितली. त्यानंतर आता आयसीसीनं घडलेल्या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. 'आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद सिडनीमधील क्रिकेट मैदानात झालेल्या वर्णद्वेषी शेरेबाजाची निंदा करते. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं या प्रकरणाच्या तपासासाठी योग्य सहकार्य करावं,' अशा सूचना आयसीसीकडून देण्यात आल्या आहेत.सर्वांना समान वागणूक द्या, कोणासोबतही भेदभाव करू नका, हे आमचं धोरण असल्याचं आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनू साहनी यांनी सांगितलं. आयसीसी कोणत्याही प्रकारचा भेदभाव सहन करणार नाही. खेळात भेदभावाला कोणतंही स्थान नाही. ऑस्ट्रेलियात घडलेल्या घटनेमुळे आम्ही निराश झालो आहोत, असं साहनी म्हणाले.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाआयसीसी